तौक्ते वादळाच्या तडाख्यात तीन नौका दुर्घटनाग्रस्त; एका मच्छिमाराचा मृत्यू, तिघे बेपत्ता   - Three boats crashed in a Tauktae hurricane; One fisherman killed, three missing | Politics Marathi News - Sarkarnama

तौक्ते वादळाच्या तडाख्यात तीन नौका दुर्घटनाग्रस्त; एका मच्छिमाराचा मृत्यू, तिघे बेपत्ता  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 मे 2021

त्यावरील मच्छीमारांना नांगर अडकलेल्या नौकेवरील मच्छीमार ओरडून खाली आमचा मच्छीमार असल्याचे सांगत होते; मात्र तरीही त्यांच्याकडून नौका मागे घेतली.

देवगड : तौक्ते चक्रीवादळाच्या (Tauktae hurricane) तडाख्याने येथील बंदरातील तीन मच्छीमारी नौका बंदर परिसरातच दुर्घटनाग्रस्त झाल्या. यातील दोन नौकांवरील सात मच्छीमारांपैकी तिघे सुखरूप आहेत. चार मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. यातील एकाचा मृतदेह खाडीकिनारी सापडला. राजाराम कृष्णा कदम (वय ५३, रा. गढीताम्हणे) असे त्यांचे नाव आहे. दिनेश गजानन जोशी (३९, रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार पांडुरंग नार्वेकर (६०, रा. टिंबर बाजारजवळ, कोल्हापूर) आणि प्रकाश काशिनाथ बिरीद (३९, राजापूर) अशी बेपत्ता मच्छीमारांची नावे आहेत. (Three boats crashed in a Tauktae hurricane; One fisherman killed, three missing)

याबाबतची महसूल यंत्रणेकडून मिळालेली माहिती अशी ः रविवारी झालेल्या अति तीव्रतेच्या चक्रीवादळामुळे येथे बंदरातील एकूण तीन मच्छीमारी नौका दुर्घटनाग्रस्त झाल्या. यातील रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या ‘रुक्‍मिणी कृपा’ नौकेवर पाच मच्छीमार होते. निरज यशवंत कोयंडे यांच्या ‘आर्ची’ मच्छीमारी नौकेवर दोन असे एकूण सात मच्छीमार होते. यातील जानू यशवंत डोर्लेकर (६१, पूर्णगड, रत्नागिरी), विलास सुरेश राघव (३७, रा. पुरळ -कळंबई) आणि सूर्यकांत साबाजी सावंत (६०, रा. हुंबरट, ता. कणकवली) सुखरूप बाहेर आले आहेत. उर्वरित चार मच्छीमार बेपत्ता झाले होते. यातील एका मच्छीमाराचा मृतदेह जामसंडे मळई परिसरात खाडीकिनारी सापडला. 

हेही वाचा : आमदार समाधान आवताडेंचा बैठकांचा धडाका

पांडुरंग कोयडे यांची ‘पांडुरंग प्रसाद' मच्छीमारी नौकाही दुर्घटनाग्रस्त झाली होती. यावर राजेंद्र सुदाराम सरोदे (५०, रा. कर्जत रायगड) आणि चंदन मारुती दाबणे (३४, रा. कर्जत रायगड) होते. पाण्यात पडल्यावर त्यांनी आरडाओरडा करताच सागरी सुरक्षा यंत्रणेने दोन्ही मच्छीमारांना वाचवल्याची माहिती सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी दिली. अन्य काही नौकाही खाडी परिसरात खडकात अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. वादळामुळे मच्छीमारांची मोठी हानी झाली. दरम्यान, आणखी एक मृतदेह खाडी परिसरात असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिस तिकडे गेले आहेत.

एकमेकांत गुंतलेले नांगर सोडवण्यास गेले आणि जिवाला मुकले 
 
येथे बंदरातील एका मच्छीमाराचा दुसऱ्या नौकेचा नांगर लागून मृत्यू झाला. शफीक अब्दूल रझाक दरवेश (वय३२, रा. गावखडी, पूर्णगड -पावस) असे त्यांचे नाव आहे. वादळामुळे बंदरात उभ्या असलेल्या नौकांचे नांगर एकमेकात गुंतल्याने ते सोडवण्यासाठी दरवेश खाली उतरले होते. त्याचवेळी दुसरी एक नौका याच नौकेच्या दिशेने मागे घेण्यात येत होती. त्यावेळी त्यावरील मच्छीमारांना नांगर अडकलेल्या नौकेवरील मच्छीमार ओरडून खाली आमचा मच्छीमार असल्याचे सांगत होते; मात्र तरीही त्यांच्याकडून नौका मागे घेतली. मागे येणाऱ्या नौकेचा पाण्यात टांगता असलेला नांगर शफीक अब्दूल रझाक दरवेश यांना लागल्याने मोठी दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

कोकणात साडेबारा हजार जणांचे स्थलांतर

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे, अशी माहिती या वेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच, विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही, हे पाहण्याच्याही सूचना दिल्या. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख