सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?  - Swabhimani Shetkari Sanghatana's agitation in front of Sachin Tendulkar's house | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

 मी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहे.

मुंबई : शेतकरी आंदोलकांच्या बाजूने ट्विट करणारी पॉपस्टार रिहाना हिला फटकाणाऱ्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला अनेकांच्या टिकेचे धनी व्हावे लागले. विशेषतः शेतकरी संघटनांकडून सचिनला लक्ष्य करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी सोमवारी (ता. 8 फेब्रुवारी) सचिनच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करत, "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील,' असा सवाल विचारला आहे. 

कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या सव्वादोन महिन्यांपासून ठिय्या मांडून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारबरोबर शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, त्यातून तोडगा निघू शकला नाही. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर पॉपस्टार रिहाना हिने ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. 

रिहाना हिच्या ट्‌विटनंतर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार यांच्यासह देशभरातील सेलिब्रिटींनी पुढे येत आमच्या देशाच्या अंतर्गत विषयात भूमिका मांडण्याची गरज नाही, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर सचिनसह इतर सेलिब्रिटीजच्या विरोधात संताप व्यक्त करत त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली जात आहे. 

गेल्या 70 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सचिनला का बोलावसे वाटले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, त्यावेळी कोणी का संवेदना व्यक्त केल्या नाहीत, असे प्रश्‍न आंदोलनाच्या समर्थकांकडून उपस्थित केले जात आहेत. शेतकरी संघटनांकडून सचिनला लक्ष्य करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सचिनच्या ट्विटचा निषेध करत आज त्याच्या मुंबईतील घरासमोर संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी आंदोलन केले. "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?,' असा सवालही त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तेंडुलकरला विचारला आहे. 

या वेळी सचिन तेंडुलकरच्या घराच्या सुरक्षा रक्षकांनी रणजित यांना घरासमोर आंदोलन करू नका, दुसऱ्या बाजूला जाऊन आंदोलन करा, असे सांगितले. त्यावेळी मी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहे, असे उत्तर देत त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. 

याच मुद्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिनची बाजू घेत विरोधकांना सुनावले आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एकच षटकार ठोकून यात वादात पडणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींची तोंडे बंद केली आहेत. सरकारला कोंडीत पकडू पाहणारे विरोधकही त्याने बेजार झाले आहेत, असे खोत यांनी म्हटले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख