काका सुनील तटकरेंसोबत पंगा घेतलेले अवधूत सध्या राजकीय विजनवासात 

तेथूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद वाढत गेला.
Sunil Tatkare became a heavyweight to Avadhut Tatkare in the dispute between uncle and nephew
Sunil Tatkare became a heavyweight to Avadhut Tatkare in the dispute between uncle and nephew

महाड : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचे वाद नवे नाहीत. खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे माजी आमदार अवधूत तटकरे यांचे उदाहरण सर्वश्रृत आहे. या दोघांमधील वादाने मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवधूत आणि त्यांचे पिताश्री विधान परिषदेचे माजी सदस्य अनिल तटकरे यांनी हातावर शिवबंधन बांधत सुनील तटकरे यांना आव्हान दिले होते. राजकारणात मुत्सद्दी असलेल्या सुनील तटकरे यांनी हे आव्हान परतवून लावत मुलगा अनिकेत यांना विधान परिषदेवर पाठविण्यात यश मिळवले. त्याचबरोबर स्वतः रायगडची खासदारकी आणि मुलीला राज्यमंत्रिपद मिळवून दिले. 

शिवसेनेची ताकद मिळालेल्या अवधूत तटकरे यांनी त्यानंतरही विरोध सुरूच ठेवला होता. परंतु सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात काकांच्या विरोधात संघर्षासाठी परजलेली सर्व हत्यारे अवधूत तटकरेंना पेटाऱ्यात ठेवाली लागली. सद्या अवधूत तटकरे आहेत कुठे, ते करतायेत तरी काय, त्यांचे पुढील ध्येय आहे तरी काय, याबाबतची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच आहे. 

नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे अवधूत तटकरे सद्या राजकीय विजनवासातील दिवस काढत आहेत. सद्याची राजकिय परिस्थिती आपल्यासाठी योग्य नाही, असेच त्यांचे म्हणणे आहे. हे दिवस सरतील, यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे राजकीय भेटीगाठी, राजकीय भाष्य, हस्तक्षेप न करता पूर्णपणे व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सद्याची राजकिय परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल नसल्याने काही दिवस शांत राहण्याचे धोरण अवधूत तटकरे यांनी स्वीकारल्याचे दिसून येते. 

काका सुनील तटकरे यांचे बोट पकडून स्थानिक राजकारणात आलेल्या अवधूत यांना सर्वप्रथम रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद मिळाले. ते या पदावर आठ वर्ष होते. त्यानंतर ज्या मतदार संघातून सुनील तटकरे आमदारकीची निवडणूक लढवत, त्या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून 2014 ची आमदारकी मिळाली. 

श्रीवर्धन मतदार संघ तटकरे कुटुंबीयांचा हक्काचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून आपल्या मुलांना संधी न देता सुनील तटकरे यांनी पुतण्याला संधी दिली होती. काकाचे पाठबळ, वडिलांची साथ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सक्षम यंत्रणा असतानाही अवधूत तटकरे ही निवडणूक हरता हरता जिंकले. त्यांचा केवळ 77 मतांनी विजय झाला होता. 

या निवडणुकीच्या प्रचारात रायगडच्या विद्यमान पालकमंत्री अदिती तटकरे आणि विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी चुलत भावाच्या प्रचारात भाग घेतला नव्हता. तेथूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद वाढत गेला. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यात अंतर्गत धुसफुस सुरू असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आला होता. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत तो विकोपाला गेला. 

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अवधूत तटकरे कोणत्या पक्षाचा आधार घेणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर विधानसभा निवडणुकीपूर्वी वडिल माजी आमदार अनिल तटकरेंबरोबर मातोश्रीवर जाऊन रितसर विधानसभेचे तिकीट मिळण्याच्या आश्वासनानंतर शिवसेनेत प्रवेश केला.

परंतु शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिल्याने मातोश्रीशी जवळीक असलेल्या विनोद घोसाळकर यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अवधूत यांना चुलत बहिण असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या विरोधात काम करावे लागले. 

या निवडणुकीत अदिती यांचा विजय झाला. त्यानंतरही अवधूत यांनी धीर सोडला नव्हता, परंतु सत्ता स्थापन करताना बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना हातावर हात ठेवून गप्प बसण्याशिवाय कोणताही आधार राहिलेला नाही. शिवसेनेत प्रवेश करून ज्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच एकत्र येत सत्ता स्थापन केली. 

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे प्रमुख घटकपक्ष आहेत, त्यामुळे पक्षीय निर्णयाविरोधात अवधूत तटकरेंना इच्छा असूनही काहीही बोलता येत नाही. आता पूर्वीसारखा कार्यकर्त्यांचा त्यांच्या भोवताली गराडाही नसतो. कामातून वेळ काढत वरसे येथील "व्हाईट हाऊस' या घरी आल्यावर काही कार्यकर्ते येतात; परंतु पूर्वीप्रमाणे कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्यानेही अवधूत तटकरे यांचा राजकीय प्रभाव कमी होत गेला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com