स्टेजची मोडतोड केली तरी संजय राऊतांनी सभा घेतलीच; बेळगावातील वातावरण झाले भगवे

सभा सुरू होण्यापूर्वीच काहींनी व्यासपीठ व साऊंड सिस्टीमची मोडतोड केली होती.
Shivsena leader MP sanjay Raut criticise karnataka government
Shivsena leader MP sanjay Raut criticise karnataka government

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी काल रात्री बेळगावमधील संयुक्त महाराष्ट्र चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वीच काहींनी व्यासपीठ व साऊंड सिस्टीमची मोडतोड केली. पण त्यानंतरही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्याचठिकाणी सभा घेतली. त्यापूर्वी त्यांचा रोड शोही झाला. राऊत यांच्या तडाखेबंद भाषणाने बेळगावमधील वातावरण भगवे झाले.

राऊत यांच्या सभेला मोठ्या संख्येने मराठी बांधवांनी गर्दी केली होती. राऊत यांच्या भाषणाने मराठी बांधवांमध्ये उत्साह संचारला. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खासदार धैर्यशील माने, प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनोरी आदी उपस्थित होते. या सभेपूर्वी राऊत यांचा रोड शोही झाला. त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले.

सभेमध्ये पंतप्रधान मोदींवर टीका करताना राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी वणवण करत आहेत. बंगालमध्ये ममतादीदी अन्याय, अत्याचार करत आहेत, असे ते म्हणतात. पण मोदीजी, अन्याय, अत्याचार, दडपशाही पाहायची असेल तर बेळगावमध्ये या. तुम्हाला बंगालमधला अत्याचार दिसतो. पण मोदी ओ मोदी, तुम्हाला तुमच्याच येडीयुरप्पा सरकारची दडपशाही दिसत नाही का?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना खुले आव्हान दिले.

पंडित नेहरूंनी चूक केली असेल. पण मग तुम्ही दुरूस्त करा. काश्मीरमध्ये पंडित नेहरूंनी 370 कलम लावून कितीतरी मोठी चूक केली. ते तुम्ही हटवले ना. मग इथेही तेच करा. माझे आणि कर्नाटक सरकारचे भांडण नाही. त्यांच्या हातात काहीच नाही. मुख्यमंत्री कोण हे मोदी ठरवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हातात काही नाही. हा लढा केंद्र सरकारशी आहे. तुम्ही न्यायाची बाजू घेत असाल, तर या बेळगावात. लोकशाही मानत असाल तर न्याय द्या. तुमची दादागिरी चालणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी ठणकावले. 

शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकपर्यंत आल्या असत्या. पण हिंदुत्वाचे नाव सांगत महाराजांचा पुतळा काढता? भाजपवाल्यांनी हे लक्षात ठेवावे. आम्ही नाक दाबायचे ठरवले तर तुमची तडफड होईल. पाणी, आर्थिक नाड्या बंद केल्या तर? हॅाटेल बंद केली तर? पण आम्ही हे पाप करणार नाही. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आहे त्यामुळे या भागात मराठी माणसाच्या एकीची वज्रमूठ कायम राहायला हवी, असे आवाहनही राऊत यांनी केले. 

बेळगाव सीमाप्रश्नासाठी रक्त सांडणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे. बेळगावसाठी 69 हुतात्मे दिले आहेत. पण यापुढे रक्त सांडणार नाही, लाठ्या-काठ्या खाणार नाही. भगव्याला हात लावला तर झेंडा खिशात ठेवून दांड्याने ठोकून काढू, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com