राणेंना दबंग नेता म्हणता; मग भाजप प्रवेशासाठी ताटकळत का ठेवले होते?  - Shiv sena's MLA Vaibhav Naik criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंना दबंग नेता म्हणता; मग भाजप प्रवेशासाठी ताटकळत का ठेवले होते? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

आता पुढच्या विधानसभेतही ते रणांगणातून पळ काढण्याचीच भीती आहे.

कणकवली : "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात नारायण राणे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे "दबंग नेते' असा केला. मग या दबंग नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देताना "तारीख पे तारीख' देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले?'' असा प्रश्‍न शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला. 

पडवे येथील मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राणेंचा दबंग नेता असा उल्लेख केला होता. त्याचा आमदार नाईक यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

ते म्हणाले की, अमित शहांना नारायण राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या सभागृहात राणेंवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन केले. 

ते म्हणाले, "पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनाला केंद्रीय गृहमंत्र्यांना आणून राणेंनी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी कितीही धैर्य एकवटून पुढची विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांना चारी मुंड्या चीत करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे. मागची विधानसभा निवडणूक लढण्याची हिंमत राणेंनी दाखवली नव्हती. आता पुढच्या विधानसभेतही ते रणांगणातून पळ काढण्याचीच भीती आहे.'' 

"अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले आणि शिवसेना संपविण्याची भाषा सुद्धा केली. मात्र, शिवसेना संपविण्याची भाषा करण्याअगोदर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास त्यांनी एकदा तपासून पाहावा. अमित शहा असेही म्हणाले, की शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले. मग जम्मू काश्‍मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कुठे बुडविले होते? आतासुद्धा बिहारमध्ये नीतिश कुमारांसोबत भाजप सत्तेत आहे. मग बिहारमध्ये तथाकथित हिंदुत्ववादी भाजप सेक्‍युलर बनलीय, की सेक्‍युलर जेडीयु हिंदुत्ववादी बनलीय याचेही उत्तर त्यांनी एकदा द्यावे,'' असे आव्हान नाईक यांनी दिले. 

जनादेश हा शब्द भाजप नेत्यांच्या तोंडी शोभत नाही. 

शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, असा आरोप करणाऱ्या शहा यांनी गोवा आणि मध्य प्रदेशात भाजपला जनादेश मिळाला होता का? याचाही शोध घ्यावा. खरं तर जनादेश हा शब्दसुद्धा भाजपच्या मंडळींच्या तोंडी शोभत नाही. भाजपला अनेक निवडणुकांमध्ये जनतेने नाकारले. पण, "ऑपरेशन लोटस'च्या गोंडस नावाखाली अमर्याद पैशांचा वापर करून आमदारांची फोडाफोडी करायची ही भाजपची कार्यपद्धती राहिली असल्याचे नाईक म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख