शिवसेनेचा सहकारातील बडा नेता भाजपत जाणार?....जिल्हाप्रमुखाने काढले पत्रक  - Shiv Sena's explanation about that post of Satish Sawant-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा सहकारातील बडा नेता भाजपत जाणार?....जिल्हाप्रमुखाने काढले पत्रक 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

कणकवली, वैभववाडी व देवगड मतदारसंघातील विधानसभेचे पुढील उमेदवार हेसुद्धा सतीश सावंतच असणार आहेत.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : दोन वर्षांपूर्वी शिवबंधन बांधलेला सहकारातील बडा नेता भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियातून गेली तीन-चार दिवस व्हायरल होत आहे. अशी पोस्ट व्हायरल करून केवळ शिवसेनेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. (Shiv Sena's explanation about that post of Satish Sawant)

सहकारात सध्या चांगल्या पद्धतीने काम करणारे व सहकारातील मोठे व्यक्तिमत्त्व जे दोन वर्षांपूर्वी घाणेरड्या राजकारणाला कंटाळून पुन्हा आपल्या मूळ पक्षात आले, ते म्हणजे सतीश सावंत हे आहेत. कणकवली, वैभववाडी व देवगड मतदारसंघातील विधानसभेचे पुढील उमेदवार हेसुद्धा सतीश सावंतच असणार आहेत. त्यामुळे आज विरोधक भविष्यात सतीश सावंतांपासून असलेला राजकीय धोका विचारात घेऊन त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र करीत आहेत, असा आरोप पडते यांनी केला आहे. 

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना आव्हान देऊ पाहणाऱ्या अमित घोडांनी घेतला हा निर्णय

शिवसेना जिल्हाप्रमुखांनी पत्रकात म्हटले आहे की, याबाबत मी स्वतः सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व आमच्या सर्व नेत्यांचा सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते सहकार, समाजकारण व राजकारणातले असे जाणकार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत होत असलेली वाढ व सर्वसामान्य, शेतकरी, गोरगरीब जनतेची सकाळपासून त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा सांगण्यासाठी त्यांच्या घरी लागलेली रांग पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, असेही पडते यांनी नमूद केले आहे. 

सिंधुदुर्गातील राजकारण असो अथवा सहकार असो त्यात यापूर्वीच्या महान नेत्यांनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली. परंतु खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही. पण गेल्या दहा वर्षांत केवळ वारसाहक्काने झालेले नेते सर्व पातळी सोडून राजकारण करीत आहेत. ही बाब अत्यंत खेदजनक आहे व सिंधुदुर्गच्या विकासाला मारक असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

विरोधकांचे घाणरेडे राजकारण

सहकारातील बड्या नेत्याला झापले, अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. हेही खोटे आहे. शिवसेनेतील लहान-मोठ्या नेतृत्वाचा व कार्यकर्त्यांचा सतीश सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सावंत यांची लोकप्रियता ही संयमी नेता अशी आहे. तर विरोधकाची लोकप्रियता राडेबाज नेतृत्व अशी आहे. विरोधकांनी आतापर्यंत फक्त हात-पाय तोडण्याची भाषा केली आहे, तर सावंतांनी गोरगरीब जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. हे जनता जाणते आहे. सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, गटनेता व सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष म्हणून जे काही काम केले आहे, ते आपल्यासमोर आहे. सावंत यांच्यावर आरोप करण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही. म्हणून विरोधक आणि त्यांचे लाचार कार्यकर्ते हे घाणेरडे राजकारण करीत आहेत, असाही आरोप पडते यांनी पत्रकातून केला आहे. 

त्या पोस्टाबाबत सावंत म्हणाले…

आमच्या पक्षात पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, दीपक केसरकर, वैभव नाईक, सतीश सावंत यांच्यासारखे नेतृत्व आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. या पोस्टबद्दल सतीश सावंत यांच्याशी बोललो. त्यावेळी ते एवढेच म्हणाले की, ‘अशा पोस्टकडे दुर्लक्ष करा’ यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ जनतेच्या प्रश्नांसाठी घालवूया. कारण जनतेला आपण करीत असलेले काम महत्त्वाचे आहे, असे पडते यानी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख