ईडीला घाबरून भाजपवासी झालेल्या राणेंनी दुसऱ्यांना धमक्या देऊ नये - Rane, who is afraid of ED, should not threaten others : Raul-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

ईडीला घाबरून भाजपवासी झालेल्या राणेंनी दुसऱ्यांना धमक्या देऊ नये

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

त्यांना बदनाम करून भाजप आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काही मिळणार नाही.

सावंतवाडी : नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये जनतेला दिलेला शब्द पूर्ण करू न शकणारे आमदार नीतेश राणे व नगराध्यक्ष संजू परब हे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे बोट दाखवत आहेत. मात्र, आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे म्हणणारे ईडीला घाबरून भाजपवासीय झाले आहेत. आता त्यांनी ईडीच्या धमक्या दुसऱ्यांना देऊ नये, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली. (Rane, who is afraid of ED, should not threaten others : Rupesh Raul)

एमटीडीसीच्या प्रकरणावरून सध्या सावंतवाडीमध्ये आमदार केसरकर तसेच नगराध्यक्ष परब यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार राणे यांनी सावंतवाडीत येऊन केसरकर यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यासंदर्भात आरोप केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापले आहे. 

हेही वाचा : शिवसेनेचा सहकारातील बडा नेता भाजपत जाणार?....जिल्हाप्रमुखाने काढले पत्रक 

शिवसेनेचे सावंतवाडीचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज (ता. २१ जुलै) पत्रक प्रसिद्धीस देत भाजप नेत्यांवर टिका केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमदार केसरकरच विकास करू शकतात, हा जनतेला विश्वास असल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिले आहे. त्यांनी सावंतवाडी शहराचा विकास करून दाखविला, हे सर्वप्रथम त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. आमदार केसरकर यांनी नगराध्यक्ष, मंत्रीपदाच्या काळात सावंतवाडी शहरामध्ये विविध विकास प्रकल्प राबविले आहेत. ते जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. त्यांचे कुटुंब सावंतवाडी शहरात दानशूर म्हणून ओळखले जाते. त्यांना बदनाम करून भाजप आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काही मिळणार नाही, हे ध्यानात घ्यावे.

आमदार राणे सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर प्रथमच शहरात आले. कोविड महामारीच्या दरम्यान सावंतवाडीकरांसाठी भाजपची सत्ता असलेल्या पालिकेमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीसाठी प्रयत्न होताना दिसले नाहीत. नगराध्यक्ष परब यांनी शहरात ज्या-ज्या घोषणा केल्या, त्या पोकळ निघाल्या आहेत. ते शहरात विकास करण्यात अकार्यक्षम राहिले. विकास कामांचे सोडा; परंतु शहरात असलेली शांतता व स्वच्छता ठेवण्यात ते अपयशी ठरले आहेत. आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे म्हणणारे ईडीला घाबरून भाजपवासीय झाले. त्यांनी ईडीच्या धमक्या दुसऱ्यांना देऊ नये. त्यामुळे जमीन घोटाळा, भ्रष्टाचाराविषयी या दोघांनी बोलू नये. जनता सत्य जाणून आहे. त्यामुळे या दोघांनाही आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही राऊळ यांनी पत्रकातून दिला आहे.

पर्यटन महामंडळाच्या शहरातील विकास प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर नगराध्यक्ष परब यांनी भाजपचे आमदार, तत्कालीन पर्यटनमंत्री व पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांची चौकशी लावण्याची मागणी करायला हवी. उलट पर्यटन महामंडळाशी संबंध नसणाऱ्या आमदार केसरकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे भाजपच्या मंत्र्यांचे पितळ उघडे पाडण्यासारखे आहे. आपला तो बाब्या म्हणण्यासारखे आहे ते, असेही राऊळ यांनी म्हटले आहे. 

शिवसेना पक्ष आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठाम उभा असून आमदार केसरकर हे अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाटिपणी अशीच सुरू राहिल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही राऊळ यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख