Rajarambapu's son is the identity I love the most: Jayant Patil | Sarkarnama

Fathers day : 'नीट शिकला नाहीस तर कासेगावला म्हसरं राखायला जाव लागेल', जयंत पाटलांनी जागविल्या वडलांच्या आठवणी

संपत मोरे 
रविवार, 21 जून 2020

आज फादर डे चे निमित्त साधत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आपले वडील माजी मंत्री राजारामबापू पाटील यांना पत्र लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. 

पुणे : आज फादर्स डेच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या वडिलांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या बद्दल भावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस. सोशल मीडिया गतिमान झाल्याच्या या काळात वेगवेगळे डे उत्साहाने साजरे होतात. 

आज फादर डे चे निमित्त साधत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आपले वडील माजी मंत्री राजारामबापू पाटील यांना पत्र लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. 

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणतात 
प्रिय दादा, 

सारा महाराष्ट्र तुम्हाला 'बापू' म्हणून ओळखतो, पण आम्ही तुम्हाला घरात 'दादा' म्हणायचो. मला तुम्ही आठवता ते म्हणजे सतत महाराष्ट्रातील जनतेसाठी कष्ट करणारे नेते म्हणून. तुमची तीच छबी माझ्या मनात कायम आहे. सातारा जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, स्वातंत्र्यानंतर सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष ते महाराष्ट्राचे एक प्रमुख नेते असा आपला प्रवास. 

लहानपणापासून मी आपला लाडका होतो. 'खोटं बोलायचं नाही, वावगं वागायच नाही, कोणी दुखावले जाईल असे शब्द बोलायचे नाहीत' ही तुम्ही दिलेली शिकवण मला रोजच आठवते. तुमच्या प्रेरणेने मी राज्यात काम करत असलो, तरी आजही राज्यात लोक मला राजारामबापूंचा मुलगा म्हणून ओळखतात आणि तीच ओळख मला जास्त प्रिय आहे. 

आम्ही लहानपणी अभ्यास केला नाही की तुम्ही म्हणायचा, 'नीट शिकला नाहीस तर कासेगावला म्हसरं राखायला जाव लागेल' आणि मग आम्हाला लगेच अभ्यासाचे महत्त्व समजायचे. नैतिकता, सचोटीने वागायला देखील तुम्हीच शिकवलं, जगाच्या कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही, असे शिक्षण आम्हाला तुमच्या आयुष्याकडे पाहून मिळाले. 

मी एकवीस वर्षांचा होतो, तेव्हा आपण आम्हाला सोडून गेलात. तुमच्या मार्गदर्शनापासून मी वंचित झालो, याची खंत वाटते. तुम्ही दिलेली संस्कारांची वाट कधीच सोडणार नाही."अशा भावना जयंत पाटील यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख