सुरुवातीला विरोध करणारे ठाकरे प्रकल्प पूर्ण होताच त्याचे श्रेयही घेतात  - Opposition leader Devendra Fadnavis criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

सुरुवातीला विरोध करणारे ठाकरे प्रकल्प पूर्ण होताच त्याचे श्रेयही घेतात 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

हीदेखील त्यांची एक पद्धत आहे.

मुंबई : "तुमच्या वैद्यकीय महाविद्यालयास विरोध झाला. पण, हे आपल्याला नवीन नाही. समृद्धी महामार्गालाही त्यावेळी विरोध करण्यासाठी आताचे मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) तिकडे गेले होते. पण, आता स्वतः मुख्यमंत्रीच समृद्धी महामार्गाचे कौतुक करत आहेत. सुरुवातीला ते विरोध करतात. पण, त्यांच्या विरोधानंतरही प्रकल्प होत आहे, हे लक्षात येताच ते संबंधित प्रकल्पाचे श्रेयही घेतात. हीदेखील त्यांची एक पद्धत आहे,'' अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथील मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (ता. 7 फेब्रुवारी) करण्यात आले. त्या वेळी फडणवीस बोलत होते. 

महाराष्ट्रातील दबंग नेता अशा शब्दांत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "अनेक लोक स्वप्नं पाहतात. मात्र, आपली झोप विसरून त्या स्वप्न पूर्तीसाठी अहोरात्र मेहनत करणारे कमी असतात. त्यापैकी राणे हे आहेत. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात 650 बेडचे हॉस्पिटल तयार करणे, हा धाडसी निर्णय आहे. मेडिकल कॉलेजसाठी त्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु संबंधित गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांनी अखेर कॉलेज सुरू केले. आज स्वप्नपूर्तीचा आनंद नारायण राणे यांना होत असेल.'' 

"कोविडच्या काळातही टेस्टिंगची व्यवस्था करण्यासाठी येथील आमदार आणि राणे यांनी अत्याधुनिक टेस्टिंग मशिन घेतली आणि त्याद्वारे सिंधुदुर्गमधील लोकांना सेवा देण्यात आली,' असे फडणवीस म्हणाले. 

कोविड काळात महाराष्ट्राची अवस्था काय झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. केंद्र सरकारने परवाच संसदेत आर्थिक पाहणीचा अहवाल मांडला. त्यात कुठल्या राज्याने प्रभावी काम केले आहे. कुठल्या राज्याने प्रभावी काम केले नाही, याचा उल्लेख आहे. दुर्दैवाने, ज्या राज्यात कोविडमध्ये सर्वात वाईट काम झालं, अशा राज्याचे नाव आहे, महाराष्ट्र. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात हे पहायला मिळते, हे दुर्दैवी आहे. आपल्याकडे सर्वात मोठी व्यवस्था असूनही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूही महाराष्ट्रात झाले, हे आपल्याला पहायला मिळाले, अशा शब्दांत कोविड काळातील राज्य सरकारच्या कामगिरीवर फडणवीस यांनी बोट ठेवले. 

ते म्हणाले, "कोविड काळात राज्यात कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. पण, आम्ही राजकारण केलं नाही. भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले. सरकारच्या पाठीशी उभे राहिलो. पुरोगामी महाराष्ट्राची कोरोनामध्ये एवढी वाईट अवस्था का झाली, याचा विचार करण्याची गरज आहे.'' 

कॉलेजच्या अध्यक्षांचा आवर्जून उल्लेख 

या कार्यक्रमात एक कमरतात आहे. कॉलेजच्या अध्यक्षा खाली बसल्या आहेत आणि आपण सर्व व्यासपीठावर बसलो आहोत. पण, वहिनी पाठीशी राहून काम करत असतात, त्यामुळेच नारायण राणे यशाची शिखरे पादाक्रांत करत असतात, अशा शब्दांत नीलम राणे यांचे फडणवीस यांनी कौतुक केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख