मंत्रीमंडळामध्ये मोफत लसीकरणावरून 'तू-तू मैं-मैं' अन् काँग्रेसचे मंत्री लाचार

मोफत लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
MLA Gopichand Padalkar criticise state government over free vaccination
MLA Gopichand Padalkar criticise state government over free vaccination

सांगली : मोफत लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाच्या प्रस्तावावर सही केली असली तरी उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लसीकरणाच्या निर्णयासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेवर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, वसुलीच्या मानसिकतेत असलेलं सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेताना यांचे हात थरथर कापत आहेत. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण मोहिम अधिकाधिक राबविणे हा एकमेव पर्याय असताना महाराष्ट्र सरकार ठामपणे कुठलीही भूमिका घेत नाही. 

मंत्रीमंडळामध्ये मोफत लसीकरणावरून तु-तु मै-मै सुरू आहे. दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी मोफत लसीकरणाबाबत आग्रही आहेत. पण महाराष्ट्रातील त्यांचे मंत्री सत्तेसाठी दोन्ही पक्षांपुढे नांग्या टाकून बसले आहेत. त्यांचे सरकारमध्ये काही चालत नाही, अशीच परिस्थिती दिसत आहे. काँग्रेसचे मंत्री सत्तेमुळे लाचार झाले आहेत. सोनिया गांधींचेही ते ऐकत नाही, अशी टीका पडळकर यांनी काँग्रेसवर केली.

केंद्र सरकारने मार्केटमधून लशी घेण्यास सांगितले आहे. पण राज्य सरकारची यावर खर्च करण्याची मानसिकता दिसत नाही. हे सर्व वसूलीमध्ये व्यस्त आहेत. राज्यातील जनतेचे त्यांना काही पडलेले नाही. लसीकरणाबाबत शासन गंभीर नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात राज्यात काहीतरी वेगळे करतोय, असे दाखविले. पण त्यांनी केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. मोफत धान्य देण्याची घोषणा केली. आज गावागावामध्ये कुटूंब बाधित होत आहेत. पण आज एकही किलो धान्य लोकांपर्यंत पोहचलेलं नाही. राज्यातील असंघटित नोंदणीकृत कामगारांना एक दमडीही पोहचली नाही. केवळ घोषणा करायच्या केंद्र सरकारवर टीका करायची. आरोग्य व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सरकार अपयशी ठरले असून स्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य यंत्रणेवर अधिकाधिक पैसे खर्च करून लोकांना मदत करावी, अशी विनंतीही पडळकर यांनी केली. 

दरम्यान, महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचे ट्विट केले. पण ते काहीवेळाने डिलिट केले. त्यामुळे मोफत लसीकरणाबाबत संभ्रम वाढला. राज्य सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपकडून या गोंधळावरून जोरदार टीका केली जात आहे. 

मोफत लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोड्यात टाकणारं उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोफत लशीकरणाच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. पण याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे. यामध्ये त्यावर चर्चा होईल. मोफत लसीकरणावर थेट भाष्य करणार नाही. आर्थिक भाराचे निर्णय मुख्यंत्री घेतात. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत संकेतही दिले. लसीबाबत ग्लोबल टेंडरवरही चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com