पालकमंत्रिपद का काढून घेतले, याचा विचार केसरकरांनी करावा  - Kesarkar should consider why he was removed from the post of Guardian Minister | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्रिपद का काढून घेतले, याचा विचार केसरकरांनी करावा 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

त्या वीस वर्षांत त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले.

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्रिपद त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे काढून घेण्यात आले आहे. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा केसरकरांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, असा टोला सावंतवाडीचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) लगावला. 

रवी जाधव यांचा स्टॉल उभारण्याबाबत कोणताही लेखी आदेश अद्यापपर्यंत झाला नाही. तसा आदेश झाल्यास आम्ही योग्य उत्तर संबंधितांना कळवू, असाही इशारा परब यांनी दिला. 

सावंतवाडी येथील मोती तलाव काठी आठवडा बाजार भरविणे चुकीचे असल्याचे यापूर्वी आमदार केसरकर यांनी सांगितले होते. याबाबत नगराध्यक्ष परब यांना विचारणा केली असता ते म्हणाले, "याआधी वीस वर्ष पालिका आमदार केसरकर यांच्या ताब्यात होती. त्या वीस वर्षांत त्यांना वाटेल ते त्यांनी निर्णय घेतले. आता दोन वर्ष पालिका आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरवासियांना योग्य होईल, असे निर्णय आम्ही घेत आहोत.'' 

"सध्याचा बाजार आम्ही मोती तलावाकाठी भरवत असून आतापर्यंत तरी त्याला कोणत्याही नागरिकाने किंवा व्यापाऱ्याने विरोध केलेला नाही. त्यामुळे मोती तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांनी पालकमंत्री असताना बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता दाखवली आहे. त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यामुळे आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नये. आमची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. पालकमंत्रिपद का काढून घेतले याचा विचार करावा,'' अशा शब्दांत परब यांनी केसरकर यांच्यावर टीका केली. 

या वेळी नगरविकास मंत्र्यांनी रवी जाधव यांचा स्टॉल त्याच जागेवर उभारण्याचा आदेश दिला आहे का? अशी विचारणा केल्यावर परब यांनी असा कोणताही आदेश अद्यापपर्यंत आपल्याजवळ आला नाही. अशा प्रकारचा आदेश प्राप्त झाल्यास आपण संबंधितांना योग्य ते उत्तर कळवू, असे या वेळी परब यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख