फडणवीस हे मराठी माणसांसोबत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले - He showed that Fadnavis is not with Marathi people: Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

फडणवीस हे मराठी माणसांसोबत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

दिल्लीतील हायकमांडला खूष करण्यासाठी फडणवीस नेहमीच विरोधी भूमिका घेतात.

बेळगाव : मराठी भाषिकांच्या बाजूने देवेंद्र फडणवीस नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला विरोध करणे, त्यांनी टाळले पाहिजे होते. मात्र, दिल्लीतील हायकमांडला खूष करण्यासाठी फडणवीस नेहमीच विरोधी भूमिका घेत असतात, अशी टीका महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी (ता. १६ एप्रिल) बेळगावला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या बरोबर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे उपस्थित होते. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १५ एप्रिल) बेळगाव येथे येऊन समितीच्या विरोधात प्रचार सभा घेतली होती. याचा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. दिल्लीतील हायकमांडच्या सांगण्यावरून ते प्रचाराला आले. मात्र, त्यांनी प्रचारसभा घेऊन मराठी भाषिकांच्या भावनांना छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रश्न असो किंवा इतर समस्यांबाबत ते केंद्राबरोबर भांडण्यासाठी कधीच एकत्र येत नाहीत. सत्तेत असतानादेखील फडणवीस सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न किंवा समितीच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले त्यामुळे येथील लोकांना भाजपबाबत वेगळा अनुभव आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

संजय राऊतच फडणवीसांना चांगल्या पद्धतीने उत्तर देतील

सीमाप्रश्न सुटावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री छगन भुजबळ आदींनी या ठिकाणी येऊन अनेकदा आंदोलने केली आहेत. तसेच, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी नेहमीच येथील मराठी भाषिकांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यामुळे समितीच्या जुन्या जाणत्या नेत्यांचा व युवा वर्गाचे मिलाफ झाला आहे.

समितीचे उमेदवार चांगल्या संख्येने विधान सभेत निवडून जात होते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट असून फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला संजय राऊत हे चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. 

सुप्रीम कोर्टातील दाव्याला वेग येण्यासाठी सरकार प्रयत्नशील

सर्वोच्च न्यायालयात दाव्याला वेग यावा, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, वकील मंडळी पूर्ण तयारीशी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयार आहे. मात्र, तारीख लांबनीवर पडत आहे, त्यामुळे दाव्याला विलंब होत आहे. मात्र, याबाबत सरकार आपल्या पध्दतीने काम करीत आहे असे मत व्यक्त केले

महाराष्ट्र सरकारचे बेळगावात संपर्क कार्यालय

कोल्हापूर, सांगली आदी भागातील आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह आम्ही सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या संपर्कात असतो, तरीही महाराष्ट्र सरकारचे संपर्क कार्यालय बेळगाव येथे पाहिजे, अशी मागणी पुढे येत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल, अशी माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख