मनसेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षांसह पाच पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा  - Five people, including MNS Sangli district vice-president, resigned | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षांसह पाच पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

पक्षांतर्गत कुरबुरीमुळे त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

सांगली : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 7 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. आम्ही फक्त पद सोडत आहोत, आगामी काळातही आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत राहणार आहोत, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलेले आहे. 

दरम्यान, राजीनामा दिलेल्या पाच जणांनी व्यक्तीगत कारणामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले असले, तरी पक्षांतर्गत कुरबुरीमुळे त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगरे, जिल्हा सचिव आशिष कोरी, महापालिका क्षेत्र अध्यक्ष विनय पाटील, सांगली शहराचे अध्यक्ष दयानंद मलपे आणि कुपवाड शहराचे सचिव सागर चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी या विषयावर फार बोलणार नाही, बोलण्यासारखे काही नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

सांगली जिल्हा मनसेचे अध्यक्ष तानाजी सावंत हे आहेत. माजी आमदार नितीन शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसेचा जिल्ह्यात एकच गट शिल्लक आहे. त्यामुळे राजीनामा देणाऱ्यांच्या कुरबुरी नेमक्‍या कुणासोबत सुरु होत्या, किंवा अंतर्गत वादाची कारणे काय आहेत, याबाबत मात्र जिल्ह्यात चर्चांना उधाण आलेले आहे. 

दरम्यान, मनसे सोडणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत आहे. यापूर्वी डोंबविलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला होता. डोंबिवलीत मनसेचा दुसरा महत्वाचा चेहरा असलेले मंदार हळबे यांनीही भाजपमध्ये जाणे पसंत केले होते. 

दोनच दिवसांपूर्वी विलेपार्ले विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये धुसफूस दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. सांगलीबरोबच राज्यात होणारी पडझड रोखण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे कशा पद्धतीने डॅमेज कंट्रोल करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख