काहींना वाटेल की आम्ही संभाजीराजेंना पटवलंय; पण...

ओढून ताणून जे होते, त्याला नातं म्हणता येत नाही.
Chief Minister Uddhav Thackeray lauded Sambhaji Raje at the inauguration function of Kolhapur sub-center of Sarathi Sanstha
Chief Minister Uddhav Thackeray lauded Sambhaji Raje at the inauguration function of Kolhapur sub-center of Sarathi Sanstha

कोल्हापूर : ‘‘खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सतत कौतुक करत असताना काहीजणांना कदाचित वाटेल की आम्ही त्यांना पटवलंय की काय. पण, तसा तो पटणारा माणूस नाही आहे. जे योग्य आहे, तेच बोलणारा आणि योग्य तेच कारणारा हा माणूस आहे. हेतू शुद्ध असेल तरच हे ऋणानुबंध जुळत असतात. ओढून ताणून जे होते, त्याला नातं म्हणता येत नाही,’’ असे शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांचे कौतुक केले. (Chief Minister Uddhav Thackeray lauded Sambhaji Raje at the inauguration function of Kolhapur sub-center of Sarathi Sanstha)

सारथी संस्थेच्या कोल्हापूर येथील उपकेंद्राचे उद्‌घाटन आज (ता. २६ जून) ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांना वंदन करताना त्यांच्या कार्याला साजेसे असे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सारथी उपकेंद्राचे पाऊल आपण टाकत आहोत.  मागच्या आठवड्यात सारथी उपकेंद्राबाबतचा निर्णय झाला होता. सरकारची मानसिकता असल्यानेच संभाजीराजेंसोबत चर्चा झाली. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणे, हा एक भाग झाला. सर्वच राजकीय पक्ष ते करत असतात. न्याय, हक्कासाठी रस्त्यावर उतरणे हे तर शिवसेनेच्या रक्तात भिनलेले आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी भिनवलेले आहे. त्याच विचाराची आपण सर्व लेकरं आहोत. पण, संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं, तो खरा नेता असतो. नुसतं आदळआपट करणाऱ्यांना मी नेता मानत नाही. संघर्षाच्या वेळी तो जरूर करावा. पण जेव्हा सर्वजण एक मताचे असतात, त्यावेळी संघर्ष थांबवून संवाद करायला हवा आणि तो संभाजीराजेंनी सुरू केला. सारथी उपकेंद्राचे उदघाटन हे त्याचेच फळ आहे. 

समाजाला न्याय देण्यासाठी रस्यावर उतरायचे आणि जे सध्या कोरोनाचे संकट आहे, तेच घरी घेऊन जायचे, हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही. आरक्षणाबरोबरच जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली आणि साथ पसरली, ते योग्य होणार नाही. हे ओळखून संभाजीराजेंनी समजूतदारपणे हे आंदोलन हाताळले. अनेकजण आजही आदळआपट करत आहेत. त्यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असा टोमणाही त्यांनी आज आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना लगावला. 

ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखी दिशादर्शक दैवतं जन्माला आली. त्यांचा वारसा लोकशाही पद्धतीने चालवण्याची जबाबदारी आमच्याकडे आली असेल आणि त्याला जर का आम्ही जागलो नाही तर आम्ही पद भूषविण्यास नालायक आहेात, असे मी मानतो, असे सांगून ठाकरे म्हणाले की, मराठा समाजातील गरीब मुलांचे आयुष्य घडविणारी ही सारथी संस्था शाहू महाराजांच्या करवीर नगरीत त्यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू करतो आहोत, त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. 

ते म्हणाले की, मराठा समाज सामंजस्य आहे. मनात आणलं असतं तर ते काहीही करू शकले असते. पण, आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. त्यामुळे आगडोंब उसळून चालणार नाही. सरकार जर ऐकत नसते तर संघर्षासाठी मीच तुमच्याबरोबर रस्त्यावर उतरलो असतो. सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देतो की मराठा सामाजासाठी जे जे काही करता येईल, ते करायला सरकार कोठेही मागे राहणार नाही. सरकार तुमच्या खांद्याला खांदा लावून लढेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com