Uddhav Thackeray did not extend lockdown due to pressure from allies, criticizes Bhatkhalkar | Sarkarnama

मित्रपक्षांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन वाढविले नाही, भातखळकरांची टीका 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

पोलिसांनी रविवारपासून नागरिकांवर हे बंधन लागू केले आहे. मात्र हे बंधन मुळात कोणी व कशासाठी लादले याचा खुलासा झाला नाही.

मुंबई : टाळेबंदी नसली तरी नागरिकांनी दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू नये, या बंधनामुळे नागरिकांची मोठीच गैरसोय होत आहे. त्यामुळे या बंधनाचा अतिरेक करू नये, असे आवाहन प्रदेश भाजपचे भाजपचे राज्य सरचिटणीस आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. 

पोलिसांनी रविवारपासून नागरिकांवर हे बंधन लागू केले आहे. मात्र हे बंधन मुळात कोणी व कशासाठी लादले याचा खुलासा झाला नाही. हे बंधन लादण्यामागील निकष काय हे देखील लोकांना कळले पाहिजे. आता टाळेबंदीतून बरीच सवलत देण्यात आली आहे. दुकाने, कार्यालये काही प्रमाणात सुरू झाली आहेत, मग आता हे नवे निर्बंध कशासाठी, असा प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे. 

रविवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी या मुद्यावर नागरिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यात सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडला. एकीकडे आपण अनलॉकिंग च्या गोष्टी करत असताना पुन्हा असे निर्बंध लादणे हा तुघलकी निर्णय असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.

मुळात मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवायाच होता, मात्र मित्रपक्षांच्या दबावामुळे त्यांना तसे करता आले नाही. यामुळे पुन्हा मागीलदाराने लॉकडाऊन आणण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कोरोना ला आळा घालण्यात प्रशासन अपुरे पडल्याची कबुलीही याद्वारे दिली जात असल्याची लोकांना शंका आहे. त्यामुळे हा तुघलकी निर्णय मागे घ्यावा, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख