शिक्षणमंत्री सामंत चिपळूणातील सांस्कृतिक केंद्राच्या प्रेमात

निवडणुकीच्यावेळी राजकारण करा पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा.
Uday Samant .jpg
Uday Samant .jpg

चिपळूण (जि. रत्‍नागिरी) : निवडणुकीच्यावेळी राजकारण करा पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा, अशी सूचना उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना केली. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपले अधिकार वापरावे अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.

चिपळूण पालिकेच्या मालकीचे अनेक प्रकल्प तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. यातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय सामंत यांनी फारच मनावर घेतला आहे. सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू असल्यामुळे सामंत हे सांस्कृतिक केंद्राच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. 

चिपळूण शहरातील भाजी मंडई तयार होऊन पालिकेने लिलाव प्रक्रिया राबवली. मात्र, भाजी विक्रेत्यांनी त्याला विरोध केला. पालिका प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. अशीच अवस्था इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची झाली आहे. सांस्कृतिक केंद्र तयार झाले नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केंद्राच्या उद्घाटनाचा विषय सर्वसाधारण बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेतला. त्याला शिवसेना आणि महाविकास आघाडीत सामील झालेल्या मित्र पक्षांनी विरोध केला. निविदा प्रक्रिया न करता सांस्कृतिक केंद्राचे वाढीव काम झाले आहे. अशी तक्रार महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू असताना शिक्षणमंत्री सामंत यांनी काही महिन्यापूर्वी सांस्कृतिक केंद्राला भेट दिली. केंद्राच्या कामाचे कौतूक करून आपल्याला हे केंद्र मनापासून आवडल्याचे सांगितले. तांत्रिक बाबींची पूर्तता करून सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली होती. तरीदेखील सांस्कृतिक केंद्राचा पडदा तांत्रिकबाबीत अडकून राहिला. त्यामुळे शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा शिवसेना नगरसेवक, मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. मुख्याधिकारी विधाते यांनी तांत्रिक बाबी आणि निविदा प्रक्रियेची माहिती दिली. 

सांस्कृतिक केंद्राचे काम करणार्‍या ठेकेदाराने वाढीव कामे केली आहेत. नव्याने निविदा प्रक्रिया करताना जुन्या ठेकेदाराला हे काम मिळाले नाही तर त्याचे नुकसान होणार आहे. हा मुद्दाही बैठकीत मुख्याधिकार्‍यांनी मांडला. त्यानंतर सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून आपले अधिकार वापरून सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. सांस्कृतिक केंद्र किती दिवसात खुले होईल हे नक्की सांगता येणार नाही मात्र पुढील पंधरा दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण होतील. अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. 
 
एखादी वास्तू तयार होऊन तिचा वापर झाला नाही तर ती लवकर खराब होते. चिपळूण जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथील रसिकांसाठी हे केंद्र लवकर सुरू व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सांस्कृतिक केंद्राचे लवकरच लोकार्पण व्हायला हवे असे, उदय सामंत यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com