पोलिसांच्या नेमबाजीमुळे कार्ले गाव दहशतीत - Terror in Alibaug Village due to Police Firing Range | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांच्या नेमबाजीमुळे कार्ले गाव दहशतीत

प्रमोद जाधव
रविवार, 31 जानेवारी 2021

अलिबाग तालुक्‍यातील परहूरपाडा या ठिकाणी ठाणे शहर पोलिसांचे नेमबाजीचे प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान बंदुकीच्या गोळ्या नजीकच्या कार्ले गावातील पत्रे, भिंती, खिडक्‍यांच्या काचा फोडून घरांमध्ये घुसत आहेत. त्यामुळे कार्ले गाव दहशतीच्या सावटाखाली आहे.

अलिबाग  : अलिबाग तालुक्‍यातील परहूरपाडा या ठिकाणी ठाणे शहर पोलिसांचे नेमबाजीचे प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान बंदुकीच्या गोळ्या नजीकच्या कार्ले गावातील पत्रे, भिंती, खिडक्‍यांच्या काचा फोडून घरांमध्ये घुसत आहेत. त्यामुळे कार्ले गाव दहशतीच्या सावटाखाली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

एक हजार २०० लोकसंख्येच्या कार्ले गावात अडीचशेहून अधिक घरे आहेत. गावापासून काही अंतरावरच परहूरपाडा येथे पोलिसांचे नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रामध्ये रायगड पोलिसांसह ठाणे, नवी मुंबई व अन्य पोलिस दलातील कर्मचारी नेमबाजी प्रशिक्षणासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून परहूरपाडा येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये ठाणे शहर पोलिसांमार्फत नेमबाजीचे प्रशिक्षण सुरू आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास बंदुकीची एक गोळी कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या सिंटेक्‍सच्या टाकीला छेदून आत घुसली. त्या वेळी तेथे एका महिलेसह आठ वर्षांचा मुलगा होता. सुदैवाने गोळी बाजूने गेल्याने त्यांचा जीव वाचला; मात्र या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून बंदुकीच्या गोळ्या काहींचे पत्रे, काहींच्या खिडकीच्या काचा फोडून घरात घुसत आहेत. त्यामुळे घरात राहताना तसेच बाहेर फिरतानाही जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थ सांगतात. या प्रकारांबाबत अनेक वेळा रायगड पोलिस दलाला माहिती व निवेदन देण्यात आले; मात्र अद्याप यास गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी जयेश पाटील, स्वप्नील पाटील, प्रवीण पाटील, सुनीत पाटील, सतीश पाटील, अजित पाटील, संतोष पाटील, रितेश नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्ले वाढत्या लोकवस्तीचे गाव आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परहूरपाडा येथील पोलिस नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची जागा बदलून अन्य ठिकाणी हे केंद्र बनवण्याची गरज आहे - जयंत पाटील, आमदार
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख