अमित शहांच्या पायगुणाने राज्यातलं सरकार जावं : नारायण राणे  - The state government should follow the footsteps of Amit Shah: Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांच्या पायगुणाने राज्यातलं सरकार जावं : नारायण राणे 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

अमित शहा यांच्या कोकण दौर्याबाबत भाष्य करताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. 

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे मेडिकल कॉलेज उद्घाटन रविवारी  ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा यांच्या कोकण दौर्याबाबत भाष्य करताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. 

अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं, अशी मी प्रार्थना करेन असं नारायण राणे यांनी सांगितलं. तसेच ठाकरे सरकारमुळे महाराष्ट्र मागे चाललाय, अशी टीकाही नारायण राणेंनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 

अमित शहा यांच्या दौर्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. अमित शहा हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गोवा येथून हेलिकॅाप्टरने पडवे मेडिकल कॅालेज येथे येणार असून उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण तसेच अनेक आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी नारायण राणे म्हणाले, जिथे रस्ता नव्हता पाणी नव्हते, तीन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली, डोंगराळ भाग होता, अशा ठिकाणी हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभं केलं आहे. या जिल्हयात मेडिकल ,इंजिनियरिंग कॉलेज नव्हते, शासनातर्फे असलेली वैद्यकीय सुविधा पुरेशी नव्हती, मी सहा वेळा इथून निवडून गेलो, तेव्हा मी ठरवलं की वैद्यकीय महाविद्यालय काढावे.

सर्व सुविधा असलेलं सुसज्ज असं हे वैद्यकीय महाविद्यालय आहे. माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि या कॉलेजच्या उद्घाटनाला अमित शह येतात हा आणखी मोठा आनंद आहे. मी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यावर आता राज्य शासन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहे, सुरू करण्याचा चो घाट  राज्य सरकारने घातला आहे, तो पूर्ण होणार नाही. 

ज्या दिवशी शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली, त्यावेळी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. शिवसेना धरसोड करणारा पक्ष आहे. साहेबांनंतर एक माणूस असा नाही. ज्याने जे बोलले ते पूर्ण केले. "एक ना धड भराभर चिंध्या'' अशी सेनेची अवस्था झाली असल्याचे राणे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निवडीत भाजपने बाजी मारली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

पेट्रोल डिझेलचे दर हे काही नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनी वाढवले नाहीत, ते कंपन्यांनी वाढवले, शिवसेना आंदोलन करत आहे, हा रडीचा डाव आहे असल्याची टीका राणे यांनी केली. शेतकरी आंदोलन आता वेगळ्या दिशेला चालले आहे, जिथे तिरंगा काढला जातो त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी थांबू नये, शेतकऱ्यांसाठी हा कायदा योग्य असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्ष या आंदोलनाच्या मागे आहेत, सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणे योग्य नाही. त्यांनी देशाच्या विरोधात वक्तव्य केलेलं नाही, असेही राणे यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख