सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांच्याकडून दोनवेळा पराभव झाल्याने व्यथित झालेले माजी खासदार निलेश राणे हे राऊत यांना फटके देण्यासारखे बेताल वक्तव्य करत आहेत. शिवसेना पोकळ धमक्यांना घाबरत नाही. पराभूत व्यक्तींना तर मुळीच नाही. नीलेश राणे यांनी वेळ आणि जागा निश्चित करून राऊत यांना सोडाच साध्या शिवसैनिकाला हात लावून दाखवावा, मग शिवसेना काय आहे हे दाखवून देवू, असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या शिक्षणावर टीका केली होती. यावरुन नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करत त्यांना फटके देण्याचे वक्तव्य केले होते. या विधानाचा आज पडते यांनी समाचार घेतला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, नीलम सावंत, अतुल बंगे, विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब, ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विमान हवे असेल तर मुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवा : राज्यपालांना निरोप
यावेळी पडते म्हणाले, " राऊत यांनी नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत दोन वेळा दारुण पराभव केला आहे. सलग दोन वेळा झालेल्या पराभवामुळे नीलेश राणे व्यथित झाले आहेत. त्यामुळे ते काहीही बेताल वक्तव्य करत आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीला फटके देण्याचे जाहीर वक्तव्य करून आपल्याला लोकशाही मान्य नाही, गुंडगिरी हाच आपला पिंड असल्याचे नीलेश राणे सिद्ध करत आहेत. नारायण राणे यांच्या पुण्याईमुळे नीलेश राणे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले; मात्र ज्यांचे स्वतःचे अस्तित्व नाही, अशी व्यक्ती खासदार झाली हे या मतदार संघाचे दुर्दैव होते.''
चंद्रकांत पाटील म्हणतात मनसेसोबत युती होऊ शकते, पण...
मागील दोन्ही निवडणुकीत नीलेश राणे यांचा पराभव केला. अजून पराभव हवा असेल तर २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा उभे राहून दाखवावे. कोणी यावे आणि कोनालाही मारावे ही परिस्थिती आता जिल्ह्यात राहिलेली नाही. शिवसेना कोणाच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. राणे यांनी वैफलग्रस्त होवून राऊत यांना फटके देण्याची भाषा केली आहे; परंतु हिंमत असेल तर त्यांनी वेळ आणि जागा निश्चित करून खासदार सोडाच; पण, शिवसेना कार्यकर्त्यांच्या केसाला तरी धक्का लावून दाखवावा. शिवसैनिक काय आहेत याचा अनुभव घ्यावा," असे पडते म्हणाले.
भाजपने राणेंची संस्कृती स्वीकारली का ?
आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींवर असभ्य भाषेत टीका करणे ही भाजपची संस्कृती नाही. नीलेश राणे यांच्या असभ्य भाषेचा भाजपने निषेध केला नाही. त्यामुळे भाजपने राणेंची संस्कृती स्वीकारली की काय? असा सवाल सतीश सावंत यांनी उपस्थित केला.
पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधणार
नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना फटकावण्याची भाषा करून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा व शिवसैनिकांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे संजय पडते यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

