अमित शहांची पाठ फिरताच शिवसेनेचा भाजपला दणका 

पक्षांतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
Seven BJP corporators from Vaibhavwadi Nagar Panchayat will join Shiv Sena
Seven BJP corporators from Vaibhavwadi Nagar Panchayat will join Shiv Sena

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सात नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे. पक्षांतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी या नगरसेवकांनी राजीनामा दिला, तर तो भाजपसाठी मोठा धक्का ठरणार आहे. या सातही जणांचे मोबाईल बंद असल्यामुळे चर्चेला दुजोरा मिळत आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिल्याचे मानले जात आहे. कारण, हे सात नगरसेवक उद्या (ता. 9 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीती प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या नगरपंचायतीचे 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे आहेत. नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे ते दुसऱ्या प्रभागाच्या शोधात आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये धुसफुस सुरू असल्याची चर्चा होती.

गेल्या महिन्यात नगरपंचायतीबाहेर झालेल्या हाणामारी प्रकरणानंतर या धुसफुसीत वाढ झाली होती. त्यामुळे हे नगरसेवक राजीनामा देणार अशी चर्चा होती. नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, संतोष पवार, रवींद्र तांबे, स्वप्निल ईस्वलकर या सात नगरसेवकांसह शिवाजी राणे, दीपक गजोबार आणि संतोष गजोबार यांनी आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र भाजपच्या तालुकाध्यक्षांकडे पाठविले असल्याचे समजते. 

हे सर्व नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. हे नगरसेवक उद्या (ता. 9 फेब्रुवारी) मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. एकाचवेळी या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तो भाजपसाठी धक्का ठरणार आहे. 

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची निवडणुक एप्रिलमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. परंतु तत्पुर्वीच या नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून शहरातील वातावरणदेखील तापले आहे. 

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे आहेत. या नगरसेवकांची मुदत काही महिन्यापूर्वी संपली आहे. कोरोनामुळे या नगरपंचायतीची निवडणूक झालेली नाही, त्यामुळे सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे. 

सात नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याबाबतची कोणतीही माहिती आपल्यापर्यंत नाही. त्यामुळे त्या विषयावर कोणतेही भाष्य आपण करणार नाही. 

- नासीर काझी, तालुकाध्यक्ष भाजप 

भाजपच्या सात नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते उद्या (ता. 9 फेब्रुवारी) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तालुकाप्रमुख म्हणून पक्षात त्यांचे आम्ही स्वागतच करू. 

- मंगेश लोके, तालुकाप्रमुख, शिवसेना 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com