मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे पाटील यांनी सांगितले. आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले असता माध्यमांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी फार बोलायचे टाळले. माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आलेली नाही, असे सांगत त्यांनी हा प्रश्न टाळला. मात्र, जयंत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रवेशाची शक्यता स्पष्टपणे नाकारलीही नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे व नवाब मलिक प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या दोन्ही विषयावर मी कमेंट करणार नाही कारण दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. निरपेक्षपणे चौकशी व्हावी, असे मत पाटील यांनी मांडेल.
धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. संबंधित महिलेने त्यांच्यावर आरोप केले, आता पोलीस तपास करुन पुढील कारवाईचा निर्णय घेतील, मुंडे यांनी न्यायालयात पूर्वीच ब्लॅकमेलिंगची केस दाखल केली आहे, असेही पाटील म्हणाले.
मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत जे चर्चिले जात आहे त्यामध्ये जावयाने केलेल्या घटनेला म्हणजे ती केली आहे की नाही. हे चौकशीत कळेल परंतु सासर्यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही असेही, जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

