नारायण राणेंनी खासदार राऊतांना अश्लील शब्दाने हिणवले....  - Narayan Rane uses the Wrong word to MP vinayak Raut | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंनी खासदार राऊतांना अश्लील शब्दाने हिणवले.... 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हा वाद इतका वाढला की राणे यांचा संताप अनावर झाला आणि त्या ओघात त्यांनी राऊतांना तू काय .... चा आहेस काय, असा सवाल विचारला. त्यावरून राऊत समर्थकही आक्रमक झाले होते.  

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला.

त्यामुळे हाच मुद्दा नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केली. सामंत यांनी तिलारी धरणाच्या फुटलेल्या कालव्याबद्दल संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर राऊत आणि राणे समर्थक शांत झाले.

नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. राणे आणि राऊत यांच्यात नियमीत शाब्दिक वाद होत असतात. दोन्ही नेत्यांकडून एकमेकावर सतत टिका होत असते. याचे प्रतिबिंब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. मात्र थेट तोंडावर अपशब्द राणेंनी वापरल्याने तो चर्चेचा विषय झाला.  

वैद्यकीय मदाविद्यालयावरुन राणे-राऊत यांच्यात वाद

वैद्यकीय महाविद्यालयाला परवाणगी मिळावी म्हणून नारायण राणे मातोश्रीवर दिवसातून दोन-तीन वेळा फोन करत होते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. तर त्यांच्या या आरोपाला राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले होते. 

मी माझ्या हिमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी राऊंताना दिले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख