होण्याआधीच गाजलेला महेश कोठेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश झालाच नाही... 

त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल वाढली होती.
Mahesh Kothe's entry in NCP delayed again
Mahesh Kothe's entry in NCP delayed again

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला महेश कोठे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आज (ता. 8 जानेवारी) प्रवेश नक्की झाला होता. पण, सकाळी अकरा वाजता ठरलेला पक्षप्रवेश दुपारपर्यंत झाला नव्हता. त्यातच दिवसभर वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्याने त्यांच्या प्रवेशाविषयाची उत्सुकता सोलापूरबरोबरच राज्यातील राजकीय वर्तुळातून ताणली जात होती. अखेर कोठे वगळता त्यांच्या इतर समर्थकांचा प्रवेश झाला आणि होण्याआधीच प्रचंड गाजलेला महेश कोठे यांचा मात्र आज राष्ट्रवादीत प्रवेश झालाच नाही. 

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकिट नाकारल्यापासून महेश कोठे नाराज होते. त्या नाराजीतून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता. 

अखेर दोन दिवसांपूर्वी त्याला मुहूर्त मिळाला आणि गुरुवारी (ता. 7 जानेवारी) कोठे यांनी पत्रकार परिषद घेत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. 

त्यानुसार सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे व त्यांचे समर्थक आज मुंबईत दाखल झाले होते. सकाळी अकरा वाजता त्यांचा पक्षप्रवेश ठरला होता. मात्र, दुपार झाली तरी कोठे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल वाढली होती. 

मात्र, ऐनवेळी कोठे यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी यामागे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

तत्पूर्वी सोलापूरचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आज पत्रकार परिषद घेत महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमस्वरूपी हकालपट्टी केल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले. 

महेश कोठे यांनी यापूर्वी जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना भाजपत जाण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात असल्याने 2019 मध्ये "शहर मध्य'मधील शिवसेनेची त्यांची उमेदवारी कापली असल्याचा खुलासा जिल्हाप्रमुख बरडे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com