सचिन, कोणी काही म्हणू दे; तू असाच राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत राहा!  - Former Minister of State for Agriculture Sadabhau Khot supported Sachin Tendulkar | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन, कोणी काही म्हणू दे; तू असाच राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत राहा! 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एकच षटकार ठोकून त्यांचे तोंड बंद केले आहे.

सांगली : कृषी कायद्यावरून देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात नाक खुपसणारे विदेशी कलाकार जगभरात अन्य उलथापालथ घडत असताना काय करत होते? त्यांना आमच्या देशाच्या अंतर्गत विषयात भूमिका मांडण्याची गरज नाही. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एकच षटकार ठोकून त्यांचे तोंड बंद केले आहे. सरकारला कोंडीत पकडू पाहणारे विरोधकही त्याने बेजार झाले आहेत, असे मत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिनच्या ट्‌विटनंतर उठलेल्या वादळावर व्यक्त केले आहे. 

सदाभाऊ खोत म्हणतात की, दिल्लीत 26 जानेवारी रोजी जे घडले, ते देशभरातील सर्व नागरिकांनी बघितले आहे. आपल्या न्याय, हक्कासाठी शेतकऱ्यांनी जरूर आंदोलन करावे, आम्ही तर वर्षानुवर्षे तेच करत आलो आहोत. परंतू, ट्रॅक्‍टर पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा माथेफिरू प्रयत्न करणे गंभीर आहे. तो ट्रॅक्‍टर रॅलीच्या नावाखालील पूर्वनियोजित धुडगूस होता. 

शेतकऱ्यांचे आंदोलन आता दिशाहीन झाले आहे. केंद्र सरकार कृषी कायद्यासंदर्भात सुधारणेची लवचिक भूमिका घेत आहे. तरीही आंदोलकांची ताठर भूमिका कायम आहे. शेतकरी आंदोलनाच्या आड लपलेले राजकारण आता उघड होते आहे. त्याचवेळी इंग्रजी गाणे गाणारी एक गायिका काहीतरी बोलते. मला वाटले ती अर्थतज्ज्ञ असेल, मात्र वास्तव वेगळेच निघाले. एक ट्‌विट करायला तिला कोट्यवधी रुपये मिळाल्याचेही समजले. ती अन्य जागतिक विषयांवर कधीही बोलल्याचे ऐकले नाही. जागतिक तापमान वाढ, महापूर, वादळे यात शेतकरी उद्‌ध्वस्त झाल्यावर दमडीची मदत तिने दिलेली मला तरी माहीत नाही, असे खोत यांनी नमूद केले आहे. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही रेहानाला फटकारून योग्य तेच केले आहे. सचिन आम्ही भारतीय शेतकरी तुझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहोत. कोणी काही ही म्हणू दे, तू असाच या राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत राहा. लतादिदींच्या अजरामर गाण्यांपुढे अशा टिवटिव निष्प्राण होवून पडतील, असा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी रेहानाला फटकारत सचिनची बाजू घेतली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख