भारतनाना अर्धवट साथ सोडतील, असं वाटलं नव्हतं : सुप्रिया सुळे

खूप विश्वासाच्या नात्याने भगिरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे.
Choose Bhagirath Bhalke to fulfill Bharat Bhalke's dream: Supriya Sule
Choose Bhagirath Bhalke to fulfill Bharat Bhalke's dream: Supriya Sule

पंढरपूर  ः आमदार भारतनाना भालके यांच्या सोबतीने पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे आम्ही ठरवलं होतं. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल, याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं. मात्र, भारतनाना अर्धवट साथ सोडतील, असं वाटलं नव्हतं. पण, पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे भारतनानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगिरथ भालके यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.  

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतनानांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार सुळे या ब्रीच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. खासदार सुप्रिया सुळे या रुग्णालयात पवार यांची काळजी घेत आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र बुधवारी दिसले.  

सुळे म्हणाल्या की, भालकेनाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल, याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं. मात्र, नाना अर्धवट साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने भगिरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे आपण नानांची अर्धवट राहिलेली स्वप्नं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी भगीरथ यांना घड्याळाच्या बाजूचं बटण दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी.

राज्यात सध्या लागू केलेल्या कडक निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी या सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य करूया.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com