अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल - After Amit Shah's visit, there will be a BJP chief minister in the state : Pramod Jathar | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्र्यांनीही फायलींवर स्वाक्षरी करणे बंद केले आहे.

कणकवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शनिवारी कणकवली येथे केले. 

श्रेयवादापोटी राज्यातील मंत्रीच एकमेकांच्या मतदारसंघातील विकामांना खो देत असल्याचे राज्यातील विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदारदेखील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले. 

कणकवली येथील भाजप कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. त्यांच्यासोबत भाजपचे चंद्रहास सावंत, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, "राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. तीनही पक्षातील मंत्री एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामे अडवून ठेवत आहेत. आडाळी येथे वनस्पती संशोधन प्रकल्प मंजूर झाला. पण, त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल म्हणून कॉंग्रेसचे अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला खो घातला आहे. नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची मंडळी आग्रही आहेत. मात्र, नाक कापले जाईल या भीतीने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध सुरू ठेवला आहे. 

"कॉंग्रेसचे नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज माफी देणार असल्याची भूमिका घेतली; मात्र वीज माफीचे श्रेय कॉंग्रेसकडे जाईल म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याला विरोध केला आहे. राज्यातील पेट्रोलवरील कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत; मात्र अर्थमंत्री अजित पवार पेट्रोलवरील टॅक्‍स कमी करण्याला विरोध करत आहेत,'' असा दावा जठार यांनी केला. 

भाजपचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही 

जठार म्हणाले, "सर्वच विकासकामांच्या बाबतीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी पक्षाची मंडळी एकमेकांना खो देण्याचे काम करत असल्याने राज्यातील शिवसेना पक्षाचे आमदार कंटाळले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार तर आधीच बॅकफुटवर गेले आहेत. याखेरीज राष्ट्रवादीचे मंत्री सत्तेचा गैरफायदा उठवत असल्याने मुख्यमंत्र्यांनीही फायलींवर स्वाक्षरी करणे बंद केले आहे. या साऱ्यांत नोकरशहा मंडळीही सरकारच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होईल आणि भाजपचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख