राठोड अडचणीत...पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शन प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तत्काळ कारवाईचे आदेश - The administration should take immediate action against the crowd at Pohardevi | Politics Marathi News - Sarkarnama

राठोड अडचणीत...पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शन प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तत्काळ कारवाईचे आदेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले.

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह दाखल झाले. याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. 

राठोडांना पाठिंबा देण्यासाठी पत्नी आणि मेव्हणा पोहरादेवीला जातीने हजर

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोरोनाची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलिस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. 

मी (ता. २१ फेब्रुवारी) रोजी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे. हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलने नोंदवला एेतिहासिक विक्रम! जाणून घ्या नेमका काय...
 

दरम्यान, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडे राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडे राजकारण केले जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहे. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले.  
Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख