मालवण (जि. सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील खरारे-पेंडूर ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखले. मात्र, भाजपचे माजी राज्यमंत्री तथा प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण राहत असलेल्या प्रभागातून शिवसेनेच्या वैष्णवी लाड यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराचा दारुण पराभव करताना तालुक्यात सर्वांधिक मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान मिळविला आहे. याच प्रभागातून निवडणूक रिंगणात असलेले माजी सरपंच तथा भाजप पुरस्कृत उमेदवार साबाजी सावंत यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
उच्च शिक्षित असलेल्या वैष्णवी लाड या कट्टा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी जान्हवी हिने दहावीच्या परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक, तर नीटच्या परिक्षेत देशपातळीवर उज्ज्वल यश मिळविले आहे. लाड कुटुंबीय यांचे मूळ गाव खरारे - पेंडूर आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वैष्णवी लाड यांनी शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. शेती व्यवसाय सांभाळून गेली अनेक वर्षे समाजकार्यात असलेल्या पती विष्णू लाड व संपूर्ण कुटुंबाचा भक्कम पाठिंबा तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मेहनत, जनतेच्या पाठिंब्यावर वैष्णवी लाड या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या.
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या खरारे-पराड भागात भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने तीनपैकी दोन जागांवर घवघवीत यश मिळविले. विजयानंतर वैष्णवी लाड यांनी हा विजय शिवसेनेचा व जनतेचा असल्याचे सांगितले.
आगामी काळात गावचा सर्वांगिण विकास, महिला सक्षमीकरण हेच आपले ध्येय असेल. शिवसेनेच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन. गावात भ्रष्टाचाराला थारा नसेल, असेही त्यांनी सांगितले.