पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या चांगलचं अंगाशी आले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिरीष कटेकर यांच्या अंगावर शाई टाकून तोंडाला काळे फासले. एवढ्यावरच शिवसैनिक थांबले नाही, तर भरचौकात आणून त्यांना चांगलाच चोपही दिला. या प्रकरामुळे पंढरपुरात भाजप-शिवसेना आमने सामने आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कटेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप आज (ता. 6 फेब्रुवारी) समाज माध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर लागलीच त्यांचे पंढरपुरात तीव्र पडसाद उमटले. या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या भाजप नेत्याला भररस्त्यावर ओढत आणून चोपही दिला. अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासत अंगावर साडी टाकून कटेकर यांचा निषेध करण्यात आला.
मंदिर परिसरात झालेल्या घटनेमुळे मंदिर परिसरातल पोलिस कर्मचारी धावून आल्याने या भाजप नेत्याची शिवसैनिकाच्या तावडीतून सुटका झाली. या प्रकरणी उशिरापर्यत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती. या घटनेमुळे पंढरपूर शिवसेना आणि भाजपतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

