रश्‍मी शुक्‍ला या तर फडणवीसांच्या एजंट; अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : उमेश पाटील 

शुक्‍ला यांच्या विरोधातील तक्रारीचे पत्र उमेश पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही दिले आहे.
Rashmi Shukla is the agent of Fadnavis : Umesh Patil
Rashmi Shukla is the agent of Fadnavis : Umesh Patil

सोलापूर : एका राजकीय पक्षाचा राज्य प्रवक्ता आणि पदाधिकाऱ्यांचा दलाल किंवा एजंट असा उल्लेख करून रश्‍मी शुक्‍ला यांनी माझा व माझ्या पक्षनेतृत्वाचा अपमान केला आहे. गोपनीय माहिती जगजाहीर करून जनतेचीही दिशाभूल केली आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या षडयंत्रामध्ये राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे सहभागी होऊन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी अधिकाराचा दुरुपयोग करत गोपनीय कागदपत्रे जाहीर करून अक्षम्य अपराध केला आहे. त्या स्वतःच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत एजंट म्हणून काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी केला. 

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असताना रश्‍मी शुक्‍ला यांनी ता. 20 ऑगस्ट 2020 आणि 25 ऑगस्ट 2020 या दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक यांना गोपनीय अहवाल पाठविला होता. त्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये मध्यस्थी किंवा दलाली करणारे रॅकेट आणि त्यासंदर्भातील मोबाईल फोनचे सीडीआर तपासण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामध्ये काही लोकांचे सीडीआर संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या अहवालामध्ये माझ्या नावाचा उल्लेख आल्याने व हा अहवाल समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने आपण त्यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शुक्‍ला यांच्या विरोधातील तक्रारीचे पत्र उमेश पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही दिले आहे. 

या अहवालात दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख माझ्या नावासमोर केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यापैकी सोलापूरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील सध्या नगरचे पोलिस अधीक्षक आहेत, तर सुहास बावचे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष या पदावर गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा व जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य आहे. 

पक्ष पदाधिकारी या नात्याने अधिकाऱ्यांशी संपर्क 

मनोज पाटील हे सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांसोबत कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या वेगवेगळ्या कामाच्या समस्या सोडविण्याच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी म्हणून तसेच पक्षसंघटनेचा पदाधिकारी म्हणून संवाद, संपर्क होणे हे नैसर्गिक आहे. त्यांच्यासोबत, त्यांच्या बदली किंवा पोस्टिंगच्या संदर्भात कधीही कुठलीही चर्चा झालेली नाही. 

...मग मनोज पाटलांची बदली नगरला कशी? 

रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेल्या गोपनीय अहवालात मनोज पाटील सोलापूर येथून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाकरिता इच्छुक असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक मनोज पाटील यांची बदली नगर जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर झाली आहे. मनोज पाटील यांना त्यांच्या तथाकथित इच्छेप्रमाणे बदली पोस्टिंग मिळू शकलेली नाही. तरीही मनोज पाटील यांच्या बदलीच्या संदर्भाने माझ्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक, खोडसाळपणाने, मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याकरिता करण्यात आला आहे. त्यामुळे माझे मनोज पाटील यांच्या सोबत झालेले मोबाईल संभाषण उघड करण्याचे जाहीर आवाहन पाटील यांनी केले आहे. 

सुहास बावचे वर्गमित्र असल्याने संपर्क 

सुहास बावचे हे माझे कॉलेज जीवनापासूनचे वर्गमित्र आहेत. त्यांनी व मी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात बीएसस्सी ऍग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आहे. दोघेही एकाच वसतिगृहामध्ये राहात होतो. वास्तविक कॉलेजमधील सहकाऱ्या सोबत, वर्ग मित्रासोबत केवळ तो पोलिस अधिकारी आहे म्हणून, संवाद संपर्क असणे यामध्ये काही आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

पुरावा असेल तर कारवाईस सामोरे जाण्यास तयार 

याच अहवालात गृहमंत्री यांचे खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यासोबत माझा संपर्क असल्याचे म्हटले आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याने गृहमंत्र्यांकडे नागरिकांच्या विविध प्रश्नांकरिता संपर्क होत असतो. त्या संपर्काचा, संवादाचा संदर्भ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत जोडणे, हे अत्यंत चुकीचे आहे. यासंदर्भात जर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा वरीलपैकी कोणाही अधिकारी किंवा मंत्र्यांसोबत झाल्याचे रेकॉर्डिंग किंवा इतर कुठलाही पुरावा असेल तर मी योग्य त्या कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्यास तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

माझ्या मोबाईलचे सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून तपासले? 

या अहवालात माझ्यावर आरोप करण्यापूर्वी रश्‍मी शुक्‍ला यांनी माझ्याशी संपर्क साधून माझी बाजू ऐकून घेणे आवश्‍यक होते. तथाकथित बदल्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा कुठलाही सबळ पुरावा नसताना केवळ दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बरोबर मोबाईलद्वारे संपर्क केला म्हणून तथाकथित बदल्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून शुक्‍ला यांनी माझी व माझ्या पक्षाची बदनामी केली आहे. तसेच, माझ्याविरुद्ध कोणाचीही कायदेशीर तक्रार नसताना, यासंदर्भातील कुठलीही पार्श्वभूमी नसताना, एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. ते माझ्या खासगी जीवनावर (राईट टू प्रायव्हसी) व माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारे आहे. त्यामुळे शुक्‍ला यांनी कोणाच्या परवानगीने अथवा सांगण्यावरून माझ्या मोबाईलचे सीडीआर तपासले? याची योग्य ती चौकशी होणे आवश्‍यक आहे. 

अत्यंत गोपनीय अहवाल सोशल मीडियावर कसा? 

"अत्यंत गोपनीय' असा अहवाल असल्याचा उल्लेख असूनही सर्व सोशल मीडियावर हा अहवाल कसा काय जाहीर झाला? यासंदर्भात तात्कालिक राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्‍मी शुक्‍ला व त्यांना या कामी मदत करणाऱ्या इतर अधिकारी व खासगी व्यक्ती यांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com