संभाजीराजे आज मोठा निर्णय घेणार? शरद पवारांच्या भेटीनंतर आज मुख्यमंत्री, फडणवीसांकडे

मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे.
Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav Thackarey, Devendra fadanvis
Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav Thackarey, Devendra fadanvis

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षण कायदा (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणावरून त्यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपवरही टीका केली होती. संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (SambhajiRaje meeting with CM Uddhav Thackarey, Devendra fadanvis)

मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. काही नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपनेही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांनी मात्र सुरूवातीपासूनच कोरोनामुळे रस्त्यावर न उतरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी निकालानंतर राज्यभरातील मराठा समन्वयकांशी संवाद साधत भूमिका मांडली आहे. तसेच त्यांची मंत जाणून घेतली आहे. 

गुरूवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांची भूमिका जाणून घेतली. तसेच मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले. तर आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. बाळासाहेब थोरात यांना भेटून ते काँग्रेससमोर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

काही दिवसांपूर्वी सोलापूरात बोलताना संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य केलं होतं. तसेच आरक्षणावर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीची वेळ देत नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या भेटीगाठींना त्याचाच संदर्भ जोडला जात असला तरी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळं संभाजीराजें आजच्या भेटीगाठींनंतर काय भूमिका मांडणार याची उत्सुकता आहे. 

दरम्यान, काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती शरद पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला.   

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com