कणकवली : मी कुणाचेही दडपण आणि दबाव घेत नाही. त्यामुळे माझ्या विरोधकांनी संभ्रम पसरविणे बंद करावे. आपल्यात आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मी भाजपचाच नगराध्यक्ष आहे, असे प्रत्युत्तर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज (ता. २८ जानेवारी) येथे दिले.
येथील नगराध्यक्ष दालनात नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
नलावडे म्हणाले, "शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत, असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच बंद करावेत; अन्यथा त्यांच्या घरातील सगळे बाहेर पडून घर रिकामी होण्याची वेळ येईल.''
ते म्हणाले, "मी कट्टर राणेसमर्थक आणि भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये. माझ्या भूमिकेशी मी कायम ठाम आहे. त्यामुळे दबाव व दडपण हे शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाहीत.''
भाजी मार्केट उभारून दाखवावे
भाजी मार्केटचे आरक्षण नगरपंचायतीनेच विकसित करावे, अशी वारंवार भूमिका मांडून विरोधी नगरसेवक जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजी मार्केटसाठी शहरातील पटवर्धन चौकालगत देखील जागा आरक्षित आहे. ही जागा शासकीय असल्याने भूसंपादनाचाही खर्च येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी तोंडाच्या बाता मारण्यापेक्षा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी आणावा आणि पटवर्धन चौकातील शासकीय जागेत भाजी मार्केट उभारून दाखवावे, असे आव्हानही नगराध्यक्ष नलावडे यांनी दिले.