We will not Make Event of Our Faith Says Shivsena Leaders | Sarkarnama

श्रद्धेचा इव्हेंट करणार नाही; शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची भूमिका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

रामजन्मभूमी मंदिर उभे रहात असल्याचा आम्हाला अपार आनंद आहे. यासाठी अनेक वर्षे होत असलेल्या प्रयत्नांमध्ये शिवसैनिकांचाही खारीचाच का सिंहाचाही वाटा आहेच. प्रभू रामचंद्रांबद्दल आमच्या मनात मोठी श्रद्धा आहे, मात्र त्या श्रद्धेचा इव्हेंट करायची आम्हाला गरज वाटत नाही, अशी मुंबईच्या शिवसेना नेत्यांची भूमीका आहे

मुंबई : बुधवारी अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजन समारंभानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे शहरात लहानमोठे कार्यक्रम आयोजित केले असले तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मात्र प्रभू श्रीराम आमच्या हृदयात असल्याने असे इव्हेंट करण्याची आम्हाला गरज नाही, आम्ही उद्या आमच्या मनातल्या व घरातल्या रामाची भक्तीभावाने पूजा करू, अशी भूमिका घेतली आहे. 

रामजन्मभूमी मंदिर उभे रहात असल्याचा आम्हाला अपार आनंद आहे. यासाठी अनेक वर्षे होत असलेल्या प्रयत्नांमध्ये शिवसैनिकांचाही खारीचाच का सिंहाचाही वाटा आहेच. प्रभू रामचंद्रांबद्दल आमच्या मनात मोठी श्रद्धा आहे, मात्र त्या श्रद्धेचा इव्हेंट करायची आम्हाला गरज वाटत नाही. ये हृदयीचे ते हृदयी असे आमचे व श्रीरामाचे नाते आहे, त्यामुळे कसलाही देखावा टाईप इव्हेंट करण्याची आम्हाला इच्छा नाही. मी माझ्या घरातील रामाच्या मूर्तीपुढे नतमस्तक होईन, असे दक्षिण मुंबई शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. 

आमच्या हृदयातच श्रीराम

प्रभू रामचंद्र हे हनुमंताप्रमाणे आमच्या हृदयात कायमचे निवास करून आहेत. शक्य असते तर अन्य पक्षीयांनी हनुमंताची बरोबरी करण्यासाठी हृदयातील राम दाखवण्याचाही इव्हेंटही केला असता. पण आम्हाला अशा लुटुपुटूच्या कृतीची गरज नाही. वेळ पडली तर पूर्वीप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष कामच करून दाखवू, असे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले. 

देव भावाचा भुकेला

राममंदिर निर्माण प्रक्रियेत पहिल्यापासूनच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कारसेवक शिवसैनिकांनी बजावलेली भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला ढोल वाजवून प्रसिद्धी करण्याची गरजच नाही. राममंदिर निर्माणाचे श्रेय लाटण्याचीही भाजप गरज नाही. राममंदिर आंदोलनातील कारसेवे दरम्यानच 'गर्व से कहो हम हिंदू है' ही वाघाची डरकाळी स्व. ठाकरे यांनी दिली होती. देव भावाचा भुकेला असतो, त्याला कोणताही भपका नको असतो. त्यामुळे उद्या आम्ही कोणताही कार्यक्रम न करता मनोमन किंवा घरीच श्रीरामाचे पूजन करू, असे नगरसेवक संजय घाडी म्हणाले. 

मेरे मनमे राम तनमे राम रोमरोममे राम रे

राममंदिराचे काम अखेर सुरु होत आहे याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे, या आंदोलनातील शिवसैनिकांचा पराक्रमही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला अशा इव्हेंटची गरज नाही. आमच्या तनामनात, रोमारोमात राम आहे, शिवसैनिकांचे रामावरील प्रेम, श्रद्धा हे कोणालाही सांगायची गरजच नाही. दुसरे म्हणजे संकट आल्यावर लांब पळा व सारे सुरळित झाल्यावर श्रेय घ्या, असं शिवसैनिक करत नाही. आता मंदिराचा कळस कोणीही उभारेल, मात्र त्याचा पाया शिवसैनिकांनीच रचला आहे, असे कालीनाचे आमदार संजय पोतनीस म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख