आषाढीच्या महापुजेचा मान मिळवणारे उद्धव हे ठाकरे घराण्यातले पहिले नेते - Uddhav Thackeray will be First from Thackeray Family to Perform Pooja on Ashadhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आषाढीच्या महापुजेचा मान मिळवणारे उद्धव हे ठाकरे घराण्यातले पहिले नेते

भारत नागणे
मंगळवार, 30 जून 2020

उद्धव ठाकरे उद्या पहाटे अडीच वाजता सपत्नीक  विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करणार आहेत. हा मान मिळणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. ठाकरे घराण्यात हा मान मिळवणारे उद्धव हे पहिले नेते ठरले आहेत.

पंढरपूर : कोरोना महामारीमुळे यंदाचा आषाढी पालखी  आणि यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरीही परंपरा कायम राखत आषाढी एकादशीची  विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.

उद्या पहाटे अडीच वाजता सपत्नीक ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा कऱणार आहेत. हा मान मिळणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. ठाकरे घराण्यात हा मान मिळवणारे उद्धव हे पहिले नेते ठरले आहेत.

यापूर्वी शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आणि नारायण राणे यांना मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांना तिसऱ्यांदा हा  मान मिळाला आहे.

तनपुरे मठात झाली होती मंत्रीमंडळाची बैठक

राज्यात १९९५ साली सत्तांतर झाले. शिवसेना भाजपची सत्ता आली. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता. त्यांनीच पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळावी म्हणून राज्य मंत्री मंडळाची बैठक घेतली होती.

मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनीच वाखरी ते पंढरपूर असा पाच किलोमीटर पायी वारी करण्याची प्रथा सुरु केली होती. त्या नंतर ही प्रथा बंद झाली. मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षासाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी मिळाली होती. १९९८ साली मुख्यमंत्री राणे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा कऱण्याची शेवटची संधी मिळाली. त्यानंतर १९९९ साली मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यात राज्यात सत्तांतर झाले. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.

त्यानंतर तब्बल २० ते २२ वर्षानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रुपाने शिवसेनेला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. २०१४ साली पुन्हा राज्यात भाजप- शिवसेनेचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांना सलग चार वर्षे विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली.  गेल्या वर्षी मराठा आंदोलनाकांनी देवेंद्र फडणवीस यांना आषाढी पूजेसाठी विरोध केला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय वर्षा या निवासस्थानी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली होती.

2019 मध्ये पुन्हा राज्यात शिवसेना आणि भाजप बहुमताने निवडून आले. परंतु मख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला. परिणामी शिवसेनेने मुख्यमंत्रीसाठी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला सोबत घेवून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. विरोधी विचारधार असलेल्या दोन्ही पक्षांना सोबत घेवून सत्ता चालवणारे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देखील पहिल्यांदाच  विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख