इंधन दरवाढीच्या निषेधासाठी शिवसेनेने आणल्या घोडागाड्या - Shivsena Used Bullock Carts for Agitation Against Petrol Price Hike | Politics Marathi News - Sarkarnama

इंधन दरवाढीच्या निषेधासाठी शिवसेनेने आणल्या घोडागाड्या

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत व जनतेला दिलासा न दिल्यास याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. 

मुंबई : मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरात ठिकठिकाणी घोडागाड्यांसह तसेच हातगाड्यांसह निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत व जनतेला दिलासा न दिल्यास याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. 

शहरात आज काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी वीज दरवाढीबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. तर शिवसैनिकांनी इंधन दरवाढीबद्दल केंद्राचा निषेध केला. या राजकीय जुगलबंदीमुळे सर्वसामान्यांची चांगलीच करमणुक झाली. 

आज बोरीवली, दादर, कुर्ला आदी ठिकाणी शिवसैनिकांनी इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. कुर्ला (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर कुर्ला-कालिना विभाग शिवसेनेतर्फे ही निदर्शने करण्यात आली. तर दादरच्या सेनाभवनशेजारील पेट्रोल पंपासमोरही शिवसैनिकांनी निदर्शने केली. बोरीवलीच्या (पूर्व) ओंकारेश्वर मंदिराजवळही शिवसेना विभाग क्रमांक एक तर्फे सुर्वे तसेच विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने झाली. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे काहीकाळ वाहतूकही विस्कळित झाली होती.

''मुंबईत पेट्रोलचे दर ९३ रुपयांपर्यंत पोहोचले असून या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बुडाल्याने उत्पन्न कमी झाले आहे. लोक आधीच त्रासले असून केंद्राने इंधन दरवाढ करून त्यांच्या त्रासात भर घातल्याने त्याचा निषेध करण्याची गरज आहे. केंद्राने इंधनावरील अन्य कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा,'' अशी मागणीही सुर्वे यांनी केली. 

आभाळाला दर भिडलेले इंधन परवडत नसल्याचा निषेध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी वेगळाच मार्ग वापरला. काहीं कार्यकर्त्यांनी भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्यांवर कार्यकर्त्यांना बसवून त्या गाड्या ढकलत आणल्या होत्या. तर काहींनी आपल्या दुचाकीदेखील ढकलत आणल्या. काही ठिकाणी कार्यकर्ते सायकलवरून निषेध करण्यासाठी आले होते. गोरेगावात तर कार्यकर्त्यांनी घोडागाड्या आणल्या होत्या. केंद्राने इंधन दरवाढ अशीच सुरु ठेवली, तर यापुढे जनतेला प्रवासासाठी हेच मार्ग वापरावे लागतील, अशी प्रतिक्रियाही हे कार्यकर्ते देत होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख