महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रँडचा जोर हवा; संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'रोखठोक' या सदरातून मुंबईत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. कंगना राणावतने केलेले वक्तव्य व एका इंग्रजी वृत्त वाहिनीनी चालवलेली शिवसेनेच्या विरोधातली मोहिम यावर यात लिहिण्यात आले आहे
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई : 'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच  'ब्रॅण्ड' चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. 

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'रोखठोक' या सदरातून मुंबईत सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. कंगना राणावतने केलेले वक्तव्य व एका इंग्रजी वृत्त वाहिनीनी चालवलेली शिवसेनेच्या विरोधातली मोहिम यावर यात लिहिण्यात आले आहे. ''मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,'' असे राऊत यांनी म्हटले आहे.

यात राऊत पुढे म्हणतात, "मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण 'राष्ट्रीय' म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा,''

''कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा 'मरगट्टा' आज निप्रभ झाला काय? भारतीय जनता पक्ष त्यांच्या राष्ट्रीय धोरणानुसार भूमिका घेत आहे. अशीच राष्ट्रीय भूमिका पूर्वी काँग्रेस घेत असे हे विसरता येणार नाही,'' असे म्हणत राऊत यांनी काँग्रेसवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

''आज पुन्हा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,'' असा दावा यात करण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com