दगडांवर लैला मजनूंचे मदनबाण नाहीत; प्राण्यांवर प्रेम करण्यासाठी चित्रे... - Shivsena Corporator Paintings on Rocks in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

दगडांवर लैला मजनूंचे मदनबाण नाहीत; प्राण्यांवर प्रेम करण्यासाठी चित्रे...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 डिसेंबर 2020

निर्जिव दगडांमधूनही प्राणीप्रेम किंवा पर्यावरण जागृती याचा संदेश मिळावा यासाठी दहीसरच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अशा मोठमोठ्या दगडांवर प्राण्यांची आकर्षक रंगीत चित्रे काढण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 

मुंबई : दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्रात कित्येक लहानमोठे लक्षवेधी दगड आहेत. मात्र हल्ली त्यावर लैला-मजनूंची नावे, मदनबाण अशी कलाकृती दिसते. या प्रकाराला आळा बसावा आणि त्या निर्जिव दगडांमधूनही प्राणीप्रेम किंवा पर्यावरण जागृती याचा संदेश मिळावा यासाठी दहीसरच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अशा मोठमोठ्या दगडांवर प्राण्यांची आकर्षक रंगीत चित्रे काढण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 

दहिसर पश्चिमेकडील झेन उद्यानामधील दगडांवर  पर्यटकांसाठी आकर्षक अशी प्राण्यांवरील पाषाण चित्रे रेखाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे येथील आठ-दहा फूट लांब रुंद पाषाण सहा हजार वर्षापूर्वीचे आहेत. या उपक्रमातून तेथे मनमोहक असे प्राणीसंग्रहालय साकारल्याची प्रतिक्रिया तेथे येणारे पर्यटक व्यक्त करीत आहेत. 

पालिकेचा एकही रुपयाचा निधी न वापरता शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. याठिकाणी लहान मुलांसाठी बाग, योगाभ्यास केंद्र व ओपन जिम आदी सुविधा आहेत. आता येथे रेखाटण्यात आलेल्या प्राण्यांच्या आकर्षक पाषाणचित्रांमुळे याठिकाणी येणाऱ्या स्थानिक नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चित्रे सेल्फी पॉईंट बनली आहेत.

 झेन उद्यानामध्ये असलेल्या पाषाणाचे संवर्धन करण्यासाठी सुरुवातीला एका पाषाणावर आफ्रिकन हत्तीचे चित्र रेखाटण्यात आले. त्यास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आता तेथील इतर पाषाणांवर वाघ, मगर, मोर, खवलेमांजर, जलपरी आदी आकर्षक थ्रीडी चित्रे रेखाटण्यात आल्याची माहिती शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. 

रात्रीही दिव्यांच्या प्रकाशात ही चित्रे जिवंत वाटतात व तेथे खरोखरच प्राणी उभा असल्याचा भास पर्यटकांना होतो. आता या प्राणीचित्रांच्या नजीक माहिती फलक लावण्यात येणार आहे. ज्यामुळे पर्यटकांना या प्राण्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकेल असे माजी नगरसेवक व मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. यामुळे या उपक्रमाद्वारे प्राणिमात्रांबद्दल बालगोपाळाना माहिती मिळून पर्यावरणासंदर्भात एकप्रकारे जनजागृती होणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

एरवीही आपल्याकडे अनेक डोंगरदऱ्यांवरील-घाटांवरील-पर्यटनस्थळांवरी दगडांवर, किल्ल्यांच्या भिंतीवर मदनबाण किंवा लैला-मजनूंची नावे लिहिली जातात. त्यामुळे हा अमोल नैसर्गिक ठेवा खराब होतो. ते टाळण्यासाठी असे काही वेगळे उपक्रम उपयुक्त ठरतील, अशीही प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे. आता हा उपक्रम अन्य उद्यानांमध्येही राबविला जाईल, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख