शरद पवारांचे पुणेरी टोमणे मारत राज्यपालांना उत्तर - Sharad Pawar Wrote Sarcastic Letter to Governor Bhagatsinh Koshyare | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांचे पुणेरी टोमणे मारत राज्यपालांना उत्तर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पाठवलेल्या 'काॅफी टेबल बूक' ची पोच पावती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास पुणेरी शैलीत राज्यपालांना टोमणे मारले आहेत

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पाठवलेल्या 'काॅफी टेबल बूक' ची पोच पावती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास पुणेरी शैलीत राज्यपालांना टोमणे मारले आहेत. देशाचे गृहमंत्री तुमच्यावर नाराज आहेत, अशी खोचक आठवण पवार यांनी राज्यपालांना करुन दिली आहे.

राज्यपालांच्या सचिवालयाने 'जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी' हे चित्ररुप काॅफी टेबल बूक विविध नेत्यांना पाठवले. शरद पवार यांनाही ही प्रत पाठविण्यात आली. त्याची पोच पवारांनी पत्राद्वारे दिली. पण ही पोच देत असताना आपल्या खास शैलीत पवार यांनी राज्यपालांना चिमटे काढले. "भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही,तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर  प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कोफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद,'' असा पहिला टोमणा या पत्रात आहे.

''पुस्तकात एखाद् दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे,उचचोदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्र पाहण्यात आली. तसेच निधर्म वादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,'' असाही चिमटा पवार यांनी पत्रातून काढला आहे. 

राज्यपाल कोशियारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातली मंदीरे सुरु करण्याबाबत लिहिले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका उपस्थित केली होती. या पत्राला तेवढ्याच तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले होते. शरद पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. "मी १९५७ पासूनचे सर्वच राज्यपाल पाहिले आहेत. १९६७ पासून प्रत्येक राज्यपालांचा थेट संबंध आला आहे. राज्यामध्ये या पदाला एक वेगळे महत्व आहे. सर्वांनीच या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे राज्यपाल पद महत्वाचे आहे, त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे पदही महत्वाचे आहे. त्याचीही प्रतिष्ठा राज्यापालांनी राखली पाहिजे,'' असे पवार म्हणाले होते.

''राज्यपालांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेली भाषा पदाची प्रतिष्ठा वाढविणारी नाही. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ठेवली जात नसेल तर तेही चुकीचे आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री जर याबाबात स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असतील आणि त्यानंतरही ते त्याच जागेवर बसणार असतील ल तर त्यांनी बसावे, पण, ज्यांना थोडाजरी सेन्स आहे, असा माणूस या जागेवर बसणार नाही,  मराठी भाषेत एक म्हण आहे,`शहाण्याला शब्दांचा मार` पुरेसा असतो," असे म्हणत पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला होता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख