डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!....

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीशींवरुन राज्यातले राजकारण तापले आहे. त्यामुळे संतापलेल्या राऊत यांनी विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान केले आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच भाजपचे लोक म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? असा सवाल करत शिवसेना खासदार व 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य! असे राऊत यांनी भाजपला उद्देशून सुनावले आहे.

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीशींवरुन राज्यातले राजकारण तापले आहे. त्यामुळे संतापलेल्या राऊत यांनी विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान केले आहे. ''महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका ‘महात्म्या’ने ‘ठाकरे सरकार’ पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ‘ईडी पिडी’च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला?,'' असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. 

एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपवाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत. ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे, अशीही टीका राऊत यांनी केली आहे. 

‘ईडी’ची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कायदा सगळय़ांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय?, अशी विचारणा राऊत यांनी केली आहे.

ईडी, सीबीआय सारख्या संस्था राज्य घटनेशी बांधील आहे, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार राऊत यांनी घेतला आहे. तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे असे सांगत राऊत म्हणतात, "घटनेची सगळय़ात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त १२ जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? राज्यपालांनी या जागा लगेच भरायलाच हव्यात असे घटना सांगते,''

ईडीची नोटीस मिळताच पश्चिम बंगालमधील काही नेते भाजपमध्ये सामील झाले, असे सांगून राऊत म्हणतात, "भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ईडी याकामी पौरोहित्याचे काम करीत असते. म्हणूनच मुंबईतील ईडी कार्यालयासमोर काही जागरुक मंडळींनी हेच भाजप कार्यालय असल्याचा बोर्ड ठोकून दिला. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे,'' 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com