अनिल देशमुखजी...आप कोरोना से मत डरोना! - Ramdas Athavale Wishes good Health to Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुखजी...आप कोरोना से मत डरोना!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

आपल्या कवितेद्वारे मिश्‍कील भाष्य करणारे केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनामधून बरे होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत

मुंबई  : आपल्या कवितेद्वारे मिश्‍कील भाष्य करणारे केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनामधून बरे होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आठवले यांनी आपल्या खास शैलीत अनिल देशमुख यांच्यासाठी एक कविता सादर केली.

"गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात,
गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ,
कोरोनाने माझा केला होता पिच्छा तेंव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा!
कारण तुम्ही आहात माझे चांगले मित्र,
म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे शब्दचित्र,''

केवळ मराठीत शुभेच्छा देऊन रामदास आठवले थांबले नाही, तर त्यांनी हिंदीतही कविता सादर केली.
अनिल देशमुखजी,
आप कोरोना से मत डरोना,
मैने तो बोला है गो कोरोना,
कोरोना से मत हरोना

रामदास आठवले यांना ऑक्‍टोबर महिन्यात कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हा अनिल देशमुख यांनी आठवले यांना कोरोनामुक्त होण्यासाठी याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.
'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का

रामदास आठवले यांच्या वाढदिवसाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले शैलीतूनच शुभेच्छा दिल्या होत्या.
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवलेसाहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवलेसाहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कोरोनाकाळात रामदास आठवले यांच्या कविता चांगल्याच चर्चेत राहिल्या. आपल्या पक्षातील, मित्र पक्षातील किंवा विरोधी पक्षातील कोरोनाबाधित झालेल्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. आठवले यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्यानंतर देशमुख यांनाही कवितेचा मोह आवरला नाही. कविता हा देशमुख यांचा प्रांत नसतानाही देशमुख यांनी आठवले यांना कवितेतच शुभेच्छा देत विचारपूस केली. यातून त्यांची अनेकदा जुगलबंदीही रंगली. या जुगलबंदीमुळे कोरोना काळातही कवितांची खमंग चर्चा झाली तर लोकांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलले.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख