बाळासाहेब तुम्हाला जमले नाही ते उद्धवनाही जमणार नाही : निलेश राणे यांचे खोचक ट्वीट - Nilesh Rane Tweets about Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब तुम्हाला जमले नाही ते उद्धवनाही जमणार नाही : निलेश राणे यांचे खोचक ट्वीट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

माजी खासदार निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसे ट्वीट त्यांनी केले आहे

मुंबई : बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही....स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असे लिहित माजी खासदार निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. शिवतीर्थावर ती साधीपणाने साजरी केली जात आहे. त्या मुहुर्तावर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक बनवण्यासाठी जुन्या महापौर बंगल्याची निवड करण्यात आली होती. मात्र अजूनही स्मारकाच बांधकाम सुरू होत नसल्याचा सवाल उपस्थित करत, 'महापौर बंगला की मातोश्री ३,' असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. तसे ट्वीट त्यांनी काही वेळापूर्वी केले आहे. 

दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले.  ''स्मृतीस्थळावर सेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेले आहेत. बाळासाहेब आमच्यासोबत नसल्याची वेदना जरूर आहे. पण त्यांची प्रेरणा सदैव आमच्यासोबत कायम राहिल. फक्त देहाने निरोप दिला, त्यांचे विचार, हिंदुत्व कायम सोबत आहे.  आजही देशातील राजकारण  हे बाळासाहेबांनी ५४ वर्षापूर्वी जो मुद्दा भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा मांडला त्यावरच केंद्रीत आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. आज शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी अनेक शिवसैनिक जातात. शिवाय मोठी फुलांची रांगोळी देखील काढली जाते, मात्र,  यंदा कोरोना परिस्थितीमुळे लहान रांगोळी काढत 'साहेब परत या' अशी हाक लिहून आदरांजली वाहण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि परिवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत.शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जमू नये, असा आदेश शिवसेनेने दिला आहे.  राज्यातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील शिवसैनिक, विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी ठिकाणी जमू नये असा आदेश देण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख