Mumbai's BIT Chawls Facing Danger of Covid 19 | Sarkarnama

मुंबईच्या बीआयटी चाळी - 120 वर्षांपूर्वी प्लेगवर मात; २०२० मध्ये कोविडचा शिरकाव

समीर सुर्वे
मंगळवार, 21 जुलै 2020

ब्रिटीश संसदेत प्लेगच्या साथीच्या काळात १८९८ मध्ये कायदा मंजूर करून 'बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट'ची स्थापना करण्यात आली. त्या ट्रस्टच्या शिफारशीनुसार शिवडी, माझगावपर्यंत असलेले मुंबई शहर दादर, माटुंगा शिव (सायन) पर्यंत वाढविण्यात आले. या ट्रस्टनेच मुंबईत बीआयटी चाळींची उभारणा केली. आता या चाळींमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे

मुंबई  : भारतात १२० वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या भयानक साथीनंतर मुंबईतील गलिच्छ वस्ती निर्मूलच्या दृष्टीने बीआयटी चाळी उभारण्यात आल्या होत्या. मात्र आता २०२० मध्ये या चाळींमध्ये कोविडचे संकट पसरले आहे

मुंबईत १८९६ मध्ये  प्लेगची साथ आली होती. त्यानंतर मुंबईत साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी बीआयटी चाळींची उभारणी करण्यात आली. मुंबईत पूर्वीच्या काळी बंगले नव्हते. झोपड्यांसारखी लहान घरे होती; मात्र प्लेगच्या साथीनंतर चाळी बांधण्याची खऱ्या अर्थाने सुरवात  झाली.

बीआयटी चाळींच्या माध्यमातून आली भाड्याच्या घरांची संस्कृती
ब्रिटीश संसदेत प्लेगच्या साथीच्या काळात १८९८ मध्ये कायदा मंजूर करून 'बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट'ची स्थापना करण्यात आली. त्या ट्रस्टच्या शिफारशीनुसार शिवडी, माझगावपर्यंत असलेले मुंबई शहर दादर, माटुंगा शिव (सायन) पर्यंत वाढविण्यात आले. या ट्रस्टनेच मुंबईत बीआयटी चाळींची उभारणा केली. दक्षिण आणि मध्य मुंबईत या चाळी असून मुंबईत येणाऱ्या कामगारांना या चाळीत राहण्यासाठी भाड्याची घरे मिळत असत. सरकारने राबवलेली ही 120 वर्षांपूर्वीची 'रेंटल हाऊसिंग' सिस्टिम होती. कालांतराने बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्यात आले. 

आता याच बीआयटी चाळी आणि त्यांच्या परिसरात आतापर्यंत पाचशेहून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई सेंट्रल, चिराबाजार, परळ बीआयटी या चाळीतील कोविड रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांत वाढली आहे. ई प्रभागातील माझगाव येथील सेंट मेरी मार्गावरील १२ नंबरच्या बीआयटी चाळीत तब्बल ७६ रुग्ण आढळले आहेत.

मुंबई सेंट्रल येथील बेलासिर मार्गावरील बीआयटी संकुल आणि परिसरात ९ जुलै रोजी ४१ रुग्ण होते; तर १७ जुलै रोजी ४५ रुग्ण नोंदवले गेले. परळ येथील बीआयटी चाळींमध्ये ५४ रुग्ण झाले आहेत; तर चिराबाजार येथील बीआयटी चाळ आणि परिसरात ७३ रुग्ण होते ते आता ७६ पर्यंत पोहोचले आहेत. आग्रीपाडा बीआयटी चाळींमध्ये ९७ रुग्ण आढळले आहेत. माझगाव संत मेरी मार्गावरील बीआयटी चाळींमध्ये १२७  रुग्ण आढळले आहेत. त्यात एका १२ नंबरच्या चाळीत तब्बल ७६ रुग्ण आहेत. वाडीबंदर माझगाव बीआयटी परिसरात ८३3 आणि कामाठीपुरा बीआयटी चाळीमध्ये ४९ रुग्ण आढळले आहेत; तर भायखळा बीआयटी चाळी आणि परिसरात ६४ रुग्ण आढळले आहेत.

(Edited By - Amit Golwalkar)

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख