...मगच राज्यात लॉकडाऊन करा  ः नारायण राणे

दोन वेळेच्या जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी देणार आहेत का?
MP Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray :
MP Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray :

मुंबई  ः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग खायचं काय. दोन वेळेच्या जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी देणार आहेत का? लॉकडाऊनमुळे राज्यातील जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन करण्यास तीव्र विरोध दर्शविला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन करण्यास उतावीळ झाले आहेत. मात्र, त्यांचे दोन मित्रपक्ष एवढे उतावीळ झालेले नाहीत. त्यांच्या मित्र पक्षांनी विरोध दर्शविला आहे. आता मित्र पक्षांनीच  उठाव केल्यानंतर ते घाबरले आहेत. आता सर्वचजण लॉकडाऊनच्या विरोधात उभे राहिले आहेत. शिस्तपाळा नाही तर लॉकडाऊन करू, अशी धमकी देत आहेत. लॉकडाऊनमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत, त्यांना मातोश्रीच्या बाहेर बसवलं पाहिजे. त्यांना जेवणाचं पॅकेट द्या आणि मगच लॉकडाऊन करा. स्वतः घराच्या बाहेर पडा; मगच लॉकडाऊन करा, असा इशाराही राणे यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना दिला.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे त्यांनी ठरवलेले धोरणही त्यांना पेलवलं नाही. कारण, त्यांच्याच घरात कोविडचे रुग्ण वाढले. राज्यातही कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यात कोविडचे रुग्ण कमी झाले, मग महाराष्ट्रात कसे वाढले, असा प्रश्न विचारून राज्यातील कोविड मृतांची आकडेवारीही देशात सर्वात जास्त आहे, असे राणे यांनी नमूद केले.


पवार-शहा भेट राज्याच्या हिताची 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली की नाही, हे मला माहीत नाही. पण, त्या दोघांची भेट झाली असेल तर राज्याच्या हिताची आहे. पण, ती शिवसेनेसाठी पोषक नाही, अशा सूचक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पवार-शहा भेटीवर भाष्य केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मधल्या काळात आले होते. त्या भेटीबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व गोष्टी ह्या सार्वजनिक करायच्या नसतात, असे संदिग्ध उत्तर देत शहा यांनी आणखी गोंधळ वाढवला होता.

राष्ट्रवादीकडून या भेटीचा इन्कार करत भाजपकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. तसेच खासदार पटेल यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगून अशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. 

त्याच भेटीसंदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी वरील भाष्य केले. दरम्यान, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर नारायण राणे हे तातडीने भेटण्यासाठी रुग्णालयातही गेले होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com