मुंबई : राज्याच्या काही भागात पाचवा लाॅकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. पोलिसही आपल्या परीने नागरिकांना आपल्या घरात थांबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नात अनेक पोलिस कोरोना हुतात्मेही झाले आहेत. अशा ताणाच्या परिस्थितीतही महाराष्ट्र पोलिस कुणा 'मोस्ट वाँटेड'च्या शोधात आहेत.....
कोरोनाचा कहर सुरु झाला आणि SMS त्रिसूत्रीची अंमलबजावणी सुरु झाली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर ही ती त्रिसूत्री. नंतरच्या काळात सलग चार वेळा लाॅकडाऊन झाले. देशातले व्यवहार ठप्प झाले. नंतर हळूहळू अनलाॅकिंगची प्रक्रिया सुरु झाली आणि मंदावलेल्या कोरोनाच्या विषाणूने पुन्हा एकदा उडी घेतली. याला कारण ठरले SMS ची त्रिसूत्री न पाळणारे बेशिस्त नागरिक.
आपण ह्यांना कुठे पाहिलत का?
आम्ही ह्यांचा शोध, त्यांनी गुन्हा केलाय म्हणून नाही तर ते आदर्श नागरिक आहेत म्हणून घेतोय.
तुम्हाला हे कुठे सापडले तर त्यांच्यासारखे वागा व कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आम्हाला मदत करा.#BeAResponsibleCitizen#FollowUnlockGuidelines pic.twitter.com/dxQn0PoPSj
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) July 18, 2020
तोंडाला मास्क न लावता बाहेर पडणे, कारणाशिवाय घराबाहेर पडून हिंडणे, दुचाक्यांवर ट्रिपल सीट मोकाट हिंडणे, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी करणे, दुचाकीवरुन फिरताना मास्क खाली करुन पचकन् थुंकणे हे प्रकार दिसायला लागले. त्यामुळे प्रशासन हतबल झाले. त्यामुळे काही शहरांमध्ये नाईलाजाने पाचवा लाॅकडाऊन लादावा लागला. त्यानेही नागरिक चिडले. पण प्रशासनाचा नाईलाज झाला. अनेकांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम न पाळता सोशल मिडियांवर अफवांचा धुमाकूळ घातला. त्यामुळे आधीच भयभीत झालेली जनता अधिकच भयभीत झाली.
आता महाराष्ट्र पोलिसांनी अशा मोस्ट वाॅडेडचा शोध सुरु केला आहे की जो त्यांना शेवटच्या लाॅकडाऊनच्या आधी दिसला होता. अशा मोस्ट वाँटेडना शोधण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्वीटर हँडलवर केले आहे. महाराष्ट्र पोलिस ज्या व्यक्तींना शोधताहेत त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. उलट ते आदर्श नागरिक आहेत. त्यांना पकडायचे नाहीये तर इतरांनी त्यांच्यापासून बोध घ्यायचा आहे.
हे नागरिक आहेत -
मास्क लावणारे
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणारे
नियमित पणे हात धुणारे
चुकीची माहिती समाजमाध्यमांवरुन न पसरवणारे
या नागरिकांना शोधा आणि त्यांचे अनुकरण करा असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. थोडक्यात शहाण्यांना शब्दांचा मार दिलाय म्हणाना!

