`भाजप कार्यकर्त्यांनी चप्पल दाखवली... मग आम्ही धुलाई केली` - BJP workers show chappals then we protest claims shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

`भाजप कार्यकर्त्यांनी चप्पल दाखवली... मग आम्ही धुलाई केली`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले.

मुंबई : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज मुंबईत झालेल्या संघर्षाने या दोन पक्षांतील अंतर आणखी वाढले. राम मंदिर जमिनीसाठी झालेल्या कथित गैरव्यवहरावरून `सामना`ने टीका केल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी गेले. मात्र तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. (Shivsena and BJP workers clash in Mumbai) यावरून दोन्ही पक्षांतील नेतेही सोशल मिडियात भिडले आहेत.

 राम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये  (Shivsena mouthpiece Saamna) बोट ठेवण्यात आल्याने आज भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने फटकार मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना भवनासमोर हा प्रकार सुरू असताना परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळनंतर या परिसरातील गर्दी कमी झाली असली, तरी वातावरण तंग होते. तसेच या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

नेते काय म्हणाले...

भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनावर चाल करून येत असल्याचे समजताच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तेथे जमल्या होत्या. त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी चप्पल काढून दाखवल्याने हा प्रकार घडला. शिवसेना भवनावर कोणी हल्ला करणार असाल, तर आम्ही स्वस्थ बसून राहणार नाही. राम जन्मभूमीसाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी आंदोलने केली, ती संपूर्ण देशाला माहीत आहेत, असे उत्तर आमदार सदा सरवणकर यांनी दिले; तर शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यावर कोणी वाकड्या नजरनेने बघणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिला. भाजपने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही प्रतिक्रिया शिवसेनेकडून उमटल्याचा आरोप कामगार नेते सचिन अहिर यांनी केला.

भाजपचे कार्यकर्ते चाल करून आले हे चित्र उभे केले जात आहे. भाजप कार्यकर्ते शांतपणे आंदोलन करत होते, पण आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शिवसेनेने धाकदपटशा दाखवल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

- भाजपची महिला कार्यकर्ता अक्षता तेंडुलकर यांना सर्वांनी मारहाण केली. आंदोलनानंतर आंदोलकांना अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून पोलिसांच्या आडून महिलेवर हल्ला केल्याचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. राम मंदिरासाठीच्या लोकवर्गणीला बदनाम करणारे अग्रलेख लिहिले गेले. आता मंदिराच्या निर्मितीला बदनाम केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पोलिस ठाण्यात ठिय्या
मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हे संध्याकाळी माहीम पोलिस ठाण्यात पोहोचले. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख