कंपाऊंडरकडून औषधे नकोत - भाजपला शिवसेनेला टोला - BJP Targets Shivsena over Corona Drug Posters | Politics Marathi News - Sarkarnama

कंपाऊंडरकडून औषधे नकोत - भाजपला शिवसेनेला टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी अतिउत्साहात डॉक्‍टरांचा सल्ला न घेता ही फलकबाजी केल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यास डॉक्‍टरांना न विचारता कोरोनाच्या लक्षणांनुसार कोणती औषधे कधी व किती प्रमाणात घ्यावीत, अशी जाहिरातबाजी या नगरसेवकांनी केली आहे. तसेच समाजमाध्यमांवरही त्याचा प्रसार केला आहे.

मुंबई  : कोरोनाच्या लक्षणांनुसार डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे कशी घ्यावीत, असे सांगणारे फलक शिवसेना नगरसेवकांनी प्रसिद्ध केल्यासंदर्भात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'कंपाऊंडर'कडून औषधे घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करू नये,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अशाप्रकारे औषधांची जाहिरात करणे अत्यंत चुकीचे असून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसारही तो गुन्हा आहे. त्यामुळे या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. सरकारने तात्काळ या नगरसेवकांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी अतिउत्साहात डॉक्‍टरांचा सल्ला न घेता ही फलकबाजी केल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यास डॉक्‍टरांना न विचारता कोरोनाच्या लक्षणांनुसार कोणती औषधे कधी व किती प्रमाणात घ्यावीत, अशी जाहिरातबाजी या नगरसेवकांनी केली आहे. तसेच समाजमाध्यमांवरही त्याचा प्रसार केला आहे. निदान गंभीर आजारांवरील औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्यास कोणीही प्रोत्साहन देऊ नये. शेड्यूल एच मधील औषधे तर डॉक्‍टरांच्या शिफारशीखेरीज मिळतही नाहीत. त्यामुळे त्याविरोधात जाऊन असे प्रकार करू नयेत. कारण या जाहिरातीनुसार कोणी अशी औषधे स्वतःच घेतली व त्यातून काही चुकीचे घडले तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍नही त्यांनी यासंदर्भात विचारला आहे.

शिवसेना नेत्यांकडून प्रेरणा घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्‍टरांचा सल्ला न घेता "कंपाउंडर' कडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

नको ती जाहिरातबाजी कशाला?
मुंबईत कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असताना त्यावर उपाय शोधण्याचे सोडून व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचे सोडून शिवसेना नको ती जाहिरातबाजी करण्यात मग्न आहे, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख