Anil Deshmukh Spent Sunday Evening On Mumbai's Marine Drive | Sarkarnama

'बिझी' गृहमंत्र्यांनी अनुभवले मरीन ड्राईव्हवर चार विरंगुळ्याचे क्षण!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 जुलै 2020

रविवारी सायंकाळी मी मरीन ड्राइव्ह वर निवांतपणे फेरफटका मारला. यावेळी बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना देखील भेटलो. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं. इतक्या दिवसांच्या सततच्या कामामुळे आलेली मरगळ क्षणार्धात दूर झाली, असा अनुभव गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या फेसबूक पेजवर लिहिला आहे

मुंबई : सध्या संपूर्ण जगासह महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे. या संकटाच्या काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राज्यव्यापी दौरा करत महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच बरोबर आपल्या ट्वीटर हँडलवर आलेल्या नागरिकांच्या अर्ज विनंत्याही अखंडपणे सोडवत आहेत. अशा प्रचंड व्यग्र दिनचर्येतून रविवारी गृहमंत्र्यांनी मुंबईच्या 'मरीन ड्राईव्ह' वर फेरफटका मारत विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवले.

रविवारी सायंकाळी काही निवांत क्षण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फेरफटका मारला. आपली मुंबई ही महाराष्ट्राची शान तर आहेच, पण एक समृद्ध वारसा देखील जपते आहे, असे सांगत स्वतः देशमुख यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत लिहिले आहे.  यात देशमुख म्हणतात.....''सध्या संपूर्ण जगासह महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले पोलीस डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, स्वछता दूत अहोरात्र लढा देत आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः अनेक जिल्ह्यांचा राज्यव्यापी दौरा केला. गेल्या ४ महिन्यांपासून  फ्रंटलाईनवर लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी सातत्याने बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधतो,"

कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्याचा केला विश्वास व्यक्त

ते पुढे म्हणतात....रविवारी सायंकाळी मी मरीन ड्राइव्ह वर निवांतपणे फेरफटका मारला. यावेळी बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना देखील भेटलो. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं. इतक्या दिवसांच्या सततच्या कामामुळे आलेली मरगळ क्षणार्धात दूर झाली. या संवादने मला काम करायला आणखी प्रेरणा व ऊर्जा दिली,'' लवकरच कोरोना विरोधातील हे युद्ध आपण जिंकू आणि कोरोनामुळे आपल्या गतीला बसलेला हा अल्पविराम बाजूला सारून आपण पुन्हा नव्या जोमाने उठू, दुप्पट गतीने नक्की पुढे जाऊ, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख