'फायटिंग स्पिरीट' दाखवत ७७ वर्षांच्या कीर्तीकरांची कोरोनावर मात - Seventy Seven Years old Gajanan Kiritikar Came out of Corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

'फायटिंग स्पिरीट' दाखवत ७७ वर्षांच्या कीर्तीकरांची कोरोनावर मात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

हृदयशस्त्रक्रिया झालेले आणि सत्याहत्तर वय असलेले वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांनाही नुकतेच कोरोनाने ग्रासले. मात्र कसलेले राजकारणी या नात्याने अनेक लढे जिंकलेल्या कीर्तीकरांनी त्याच 'फायटर स्पिरीट' ने अत्यंत सहजपणे कोरोनाला पराभूत केले.

मुंबई : हृदयशस्त्रक्रिया झालेले आणि सत्याहत्तर वय असलेले वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांनाही नुकतेच कोरोनाने ग्रासले. मात्र कसलेले राजकारणी या नात्याने अनेक लढे जिंकलेल्या कीर्तीकरांनी त्याच 'फायटर स्पिरीट' ने अत्यंत सहजपणे कोरोनाला पराभूत केले.

आपले वय, तब्येत याची काहीही पर्वा न करता कीर्तीकरांनी कोरोनाकाळातही आपली समाजसेवा सुरुच ठेवली होती. लोकांची मदत करतानाच त्यांच्या भेटीगाठी घेणेही सुरुच होते, अशातच त्यांना कोठेतरी संसर्ग होऊन कोरोना झाला. सामान्यतः अशा स्थितीत कोणालाही भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र ``आम्ही राजकारणातले लोक मुळातच फायटर (लढाऊ वृत्तीचे) असतो. त्यानुसार मी देखील भीतीच्या पलिकडे गेलो आहे, त्याचमुळे मी कोरोनावर मात करू शकलो,`` असे त्यांनी सांगितले.

महायोद्धे डॉक्टर
कीर्तीकर पुण्यात असताना एकदा सकाळी ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली व ती पॉझिटीव्ह आल्याने ते लगेच मुंबईला लीलावती रुग्णालयात दाखल झाले. मात्र सुदैवाने त्यांना बाकी कोणतीही लक्षणे वा त्रास जाणवला नाही, शरिरातील प्राणवायूची पातळीही ९७-९८ अशी स्थिर होती. दुसऱ्या दिवसापासून तापही आला नाही, तरी त्यांना तेथे खोलीतच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना रेमेडिसीवीर इंडेक्शनचे पाच डोस देण्यात आले, नियमित तपासण्याही सुरु होत्या. ``छातीविकारतज्ञ प्रभुदेसाई यांची देखरेख होतीच, कोरोनाला पराभूत करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्यासारख्या अनेक डॉक्टरना खरेतर महायोद्धा ही पदवी द्यायला हवी. त्यांच्या गोरेगावातील दवाखान्यात ते रात्री एक वाजेपर्यंत रुग्णांना तपासत असत. तरीही न दमता ते लिलावतीत सकाळी हजर होऊन रुग्णांची काळजी घेत असत, `` असे कीर्तीकरांनी आवर्जून सांगितले.

`` पाच दिवस तब्येत स्थिर असल्याने मला घरी सोडण्यात आले व मी पंधरा दिवस होम क्वारंटाईन राहिलो व नंतर पंधरा दिवसांनी माझी चाचणीही निगेटीव्ह आली. कोरोनाचे फारकाही दुष्परिणाम झाले नाही, फक्त नजर थोडी धुरकट झाली. मात्र तो परिणामही काही दिवसांत जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. खरे म्हणजे कोणीच कोरोनाला विनाकारण घाबरण्याचे काहीच कारण नाही. होय, प्रत्येकाने सावधगिरी बाळगलीच पाहिजे आणि तब्येत नाजूक असलेल्यांनी काळजी घेतलीच पाहिजे. मात्र विनाकारण बाऊही करू नये आणि घाबरूही नये. माझीदेखील प्रतिकारशक्ती चांगली असल्याने मी बरा होणार याची मला खात्रीच होती. आम्ही राजकारणी मुळातच लढाऊ प्रवृत्तीचे (फायटर स्पिरीट) असल्याने मी देखील आता भीतीच्या पलिकडे गेलो आहे. त्याचमुळे मी कोरोनावर मात केली. अशी लढाऊ वृत्ती सर्वांनीच दाखवली तर कोणीही कोरोनावर मात करू शकेल,`` असेही कीर्तीकर यांनी बोलून दाखवले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख