जिलबी अने फाफडा; जनाब सेनेला द्या झापडा ! - Atul Bhatkhalkar slams Shivsena for Gujrathi Meeting | Politics Marathi News - Sarkarnama

जिलबी अने फाफडा; जनाब सेनेला द्या झापडा !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. 

मुंबई : शिवसेनेने गुजराती मतदारांना भुरळ पाडण्यासाठी घेतलेल्या संमेलनाला सामान्य अन्यभाषक मुंबईकरही भुलणार नाहीत. उलट जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. 

`भाजप`चा गुजराती मतदार आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी शिवसेना लवकरच गुजराती संमेलन भरविणार आहे. त्यासाठी `जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा` अशी घोषणा शिवसेनेतर्फे दिली जाणार आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शिवसेनेच्या भ्रष्टाचारामुळे अशा संमेलनांचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. 
ते म्हणाले, अजान स्पर्धा भरवणाऱ्या शिवसेनेने आता गुजराती मतदारांना भुरळ पाडण्यासाठी संमेलन घ्यायचे ठरवले आहे. मात्र त्याला गुजराती मतदारच काय पण अन्यभाषक सर्वसामान्य मुंबईकर मतदारही भुलणार नाही. कारण शिवसेनेने फक्त मतांसाठी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने मुंबईकराचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे भले, जिलबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, अशा घोषणा शिवसेनेने दिल्या तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट, जिलबी अनेक फाफडा अन जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका आता गुजराती मतदारांनी घेतल्याचे भातखळकर यांनी सांगितले. नुकतेच वडाळा विभाग शिवसेनेने उर्दूतून काढलेल्या कॅलेंडरमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा न करता जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला होता. त्यामुळे भातखळकर यांनी शिवसेनेचा उल्लेख जनाब सेना असा केला आहे.  

किंबहुना यावेळी सर्वसामान्य मुंबईकरांनीदेखील हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेने आता मतदारांना भुलवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे येत्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख