अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका...'झेड प्लस' सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका

देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट पूनावाला यांनीनुकताच केला आहे.
Writ petition in Bombay HC for Z plus security for Adar Poonawalla
Writ petition in Bombay HC for Z plus security for Adar Poonawalla

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला आहे. कुंभमेळा आणि भारतातील निवडणुकांबाबत (Elections) बोलण्यास माझे शिर धडावेगळे होईल, असे पूनावालांनी म्हटले आहे. या धमक्यांमुळे पूनावाला यांच्या जीवाला धोका असल्याने झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. (Writ petition in Bombay HC for Z plus security for Adar Poonawalla)
 

अदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. पूनावाला यांनी कुंभमेळा आणि भारतातील निवडणुकांबाबत बोलण्यास या मुलाखतीत नकार दिला आहे. हे दोन्ही विषय संवेदनशील आहेत आणि धमक्या येत असल्याने यावर बोलणार नाही. मी खरे बोललो तर माझे शिर धडावेगळे होईल, असे पूनावालांनी म्हटले आहे. देशातील परिस्थिती एवढी बिघडेल, असे देवालाही वाटले नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका सुरू आहे. याविषयी पूनावालांना विचारणा करण्यात आली होती. 

या मुलाखतीत पूनवालांनी म्हटले आहे की, सिरम दुसऱ्या देशात आता लस उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा पुढील काही दिवसांत होईल. माझ्या खांद्यावर सध्या मोठे ओझे आहे. भारतातील काही शक्तिशाली व्यक्ती मला धमक्या देत आहेत. यामुळे पत्नी आणि मुलांसमवेत लंडनमध्ये आलो आहे. कोव्हिशिल्ड लशीसाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती मला धमकीचे कॉल करीत आहेत. 

या मुलाखतीचा संदर्भ देत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे ही मागणी केली आहे. तसेच पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमक्यांची दखल घेत राज्य शासनाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. पूनावाला यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना तातडीने झेड प्ल सुरक्षा व्यवस्था किंवा न्यायालयाने नियंत्रित केलेली सुरक्षा पुरवावी, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले पूनावाला?

मुलाखतीमध्ये पूनावाला म्हणाले की, भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्राझेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. त्यांच्या  आम्हाला लसपुरवठा करणे योग्य ठरणार नाही, अशी ही मंडळी सांगत असतात. सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लशीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने सारेच पूनावाला यांच्यावर दबाव आणत आहेत. 

पूनावाला संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. मात्र त्याआधीच लंडनमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. आणखी काही दिवस ते तेथेच वास्तव्य करणार आहेत. त्यांची पत्नी आणि मुलांसह ते तेथे राहणार आहेत. ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले आहे. 

सर्व जबाबदारी माझ्याच खांद्यावर असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. सुरवातीला आपण मोठे काम करत असल्याची भावना होती. अभिमान वाटत होता. मात्र अश्रू आणि घाम गाळूनही सिरमबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलले जात असल्याची खंत  त्यांनी व्यक्त केली. सिरमच्या कामाचे कौतुक आणि पाठिंबा मिळायला हवा होता. प्रत्यक्षात उलटेच घडत असून आम्हालाच दोष देऊन खलनायक ठरविले जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मी नफा मिळविण्यासाठी काही चुकीचे केलेले नाही. इतिहासच माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल, अशी भावना त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com